Sangli: कूपनलिकेच्या दूषित पाण्यामुळे १८ विद्यार्थ्यांना काविळीची लागण, बेडग येथील आश्रमशाळेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 13:34 IST2025-03-01T13:34:53+5:302025-03-01T13:34:53+5:30
आठ विद्यार्थ्यांवर मिरज सिव्हिलमध्ये उपचार

Sangli: कूपनलिकेच्या दूषित पाण्यामुळे १८ विद्यार्थ्यांना काविळीची लागण, बेडग येथील आश्रमशाळेतील घटना
बेडग : बेडग (ता.मिरज) येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या १८ विद्यार्थ्यांना कूपनलिकेच्या दूषित पाण्यामुळे काविळीची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. यापैकी आठ विद्यार्थ्यांना मिरज सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी केली.
आरग येथील समर्थ निवासी आश्रम शाळेत सांगली, कोल्हापूर, बीड, सोलापूर जिल्ह्यातील ५५० विद्यार्थी पहिली ते दहावीचे शिक्षण घेत आहेत. बेडग येथील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना गेली दहा वर्षे बंद असल्याने सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारातील कूपनलिकेचे पाणी पिण्यासाठी देण्यात येते.
गेल्या मंगळवारपासून शाळेतील विद्यार्थ्यांना उलटी, ताप व भूक न लागणे अशी लक्षणे सुरू झाल्याने त्यांची रक्त तपासणी करून उपचारासाठी मिरज सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. आश्रमशाळेतील कूपनलिकेचे पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर ते दूषित आढळले. यामुळे शाळेत दुसरी कूपनलिका खोदून त्याचा पिण्यासाठी वापर सुरू करण्यात आला आहे.
शाळेतील दहा ते पंधरा वयोगटातील १८ विद्यार्थ्यांना काविळीची लागण झाली असून, त्यापैकी सात जण मिरज सिव्हिलमध्ये उपचार घेत आहेत. याबाबत संस्थेचे अध्यक्ष अशोक ओमासे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बांधकाम विभागाकडून रस्त्यासाठी खुदाई करताना शाळेच्या सांडपाण्याचा पाइप फुटल्याने दूषित पाणी शाळेच्या कूपनलिकेत शिरल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले. काविळीची लागण झालेले काही विद्यार्थी चिंचणी व यात्रा व इतर यात्रांना जाऊन आल्याने ते आजारी पडल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली. समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही शाळेस भेट देऊन पाहणी केली. उपचारासाठी दाखल असलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचेही सांगण्यात आले.