सांगलीत भरदिवसा सराफाचे १८ तोळे दागिने, रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 03:56 PM2019-03-30T15:56:11+5:302019-03-30T15:57:31+5:30
माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्यासमोरील नित्यानंद कॉम्पलेक्समधील सराफ व्यवसायिका गुरमितसिंह सरदार दलबीरसिंग (वय ३८) यांचा भरदिवसा फ्लॅट फोडून १८ तोळे सोन्याचे दागिने व अडीच लाखाची रोकड लंपास करण्यात आली. २८ मार्चला सकाळी अकरा ते साडेअकरा या वेळेत ही घटना घडली. या चोरीनंतर त्यांचा कामगार विक्रमसिंह रायसिंह (रा. राजस्थान) हा गायब झाला आहे. त्यानेच चोरी केल्याचा संशय आहे.
सांगली : माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्यासमोरील नित्यानंद कॉम्पलेक्समधील सराफ व्यवसायिका गुरमितसिंह सरदार दलबीरसिंग (वय ३८) यांचा भरदिवसा फ्लॅट फोडून १८ तोळे सोन्याचे दागिने व अडीच लाखाची रोकड लंपास करण्यात आली. २८ मार्चला सकाळी अकरा ते साडेअकरा या वेळेत ही घटना घडली. या चोरीनंतर त्यांचा कामगार विक्रमसिंह रायसिंह (रा. राजस्थान) हा गायब झाला आहे. त्यानेच चोरी केल्याचा संशय आहे.
दलबरसिंह नित्यानंद कॉम्पलेक्समधील फ्लॅट क्रमांक आठमध्ये राहतात. त्यांचा सोने विक्रीचा व्यवसाय आहे. संश्यित रायसिंह हा त्यांच्याकडे दीड महिन्यापूर्वी कामाला लागला होता. त्याच्या राहण्याची सोय नसल्याने दलबरसिंह यांनी त्याला स्वत:च्या फ्लॅटमध्ये ठेऊन घेतले होते. दुकानातील कामगार असल्याने दलबरसिंह यांनी त्याच्यावर विश्वास ठेऊन फ्लॅटची चावी त्याच्याकडे दिली होती.
आठवड्यापूर्वी कारखाना परिसरात रायसिंह याने भाड्याने खोली पाहिली होती. तो तिथे रहायलाही गेला होता. त्यामुळे त्याने दलबरसिंह यांना त्यांच्या फ्लॅट चावी परत केली होती. २६ मार्चला दलबरसिंह दागिन्यांची खरेदी करण्यासाठी परगावी गेले होते. २७ मार्चला ते परत आले. २८ मार्चला शहरात पाणी टंचाई होती. घरात पाण्याचा थेंबही नसल्याने ते सकाळी अकरा वाजता मित्राच्या घरी अंघोळीसाठी गेले होते.
मध्यंतरीच्या काळात चोरट्याने दलबरसिंह यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून प्रवेश केला. कपाटामध्ये ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचे चार बॉक्स, अडीच लाखाची रोकड, असा एकूण आठ लाखाचा ऐवज लंपास केला. यामध्ये १८ तोळे दागिने होते. दलबरसिंह अंघोळ करुन साडेअकरा वाजता घरी परतले. त्यावेळी त्यांना फ्लॅटचे कुलूप काढलेले दिसले. पण कडी लावलेली होती.
कडी काढून आत गेल्यानंतर त्यांना कपाटातील साहित्य विस्कटल्याचे निदर्शनास आले. तसेच दागिने व रोकड नव्हती. हा प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी कामगार रायसिंह यास मोबाईलवर संपर्क साधला. मात्र त्याचा मोबाईल बंद होता. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
चोरट्याचा माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वान अपार्टमेंट परिसरात घुटमळले. ठसे तज्ञांना कुलूपासह कपाटावर काही ठसे मिळाले आहेत. त्याआधारे पोलिसांनी पुढील तपासाला दिशा दिली आहे. रायसिंह हा अचानक गायब झाल्याने त्यानेच ही चोरी केल्याचा संशय आहे.