जिल्ह्यासाठी १८४०० लसी आल्या अन् संपल्याही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:29 AM2021-05-06T04:29:07+5:302021-05-06T04:29:07+5:30
सांगली : जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी सरकारकडून पाच दिवसांच्या खंडानंतर बुधवारी सकाळी १८ हजार चारशे लसी दाखल झाल्या. जिल्हा ...
सांगली : जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी सरकारकडून पाच दिवसांच्या खंडानंतर बुधवारी सकाळी १८ हजार चारशे लसी दाखल झाल्या. जिल्हा परिषदेच्या आरोग्य भांडारातून तातडीने महापालिकेसह, जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांना तातडीने त्यांचे वाटप करण्यात आले. दुपारनंतर लसीकरणाला सुरुवात झाली अन् सायंकाळी सहा वाजेपर्यंत बहुतांश केंद्रांवरील लस संपलीही. शिल्लक लसी गुरुवारी तासाभरात संपतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागातून दिली आहे. त्यामुळे पुन्हा लसीची प्रतीक्षा कायम असणार आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने लस घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. सध्या ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस दिली जात आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढला आहे. सध्या या वयोगटातील नागरिकही नोंदणी करून लसीसाठी केंद्रावर जात आहेत. जिल्ह्यातील कोरोना लसींचा साठा संपल्याने सलग पाचव्या दिवशी लसीकरण ठप्प होते. पाच दिवसांच्या खंडानंतर सोमवारी सकाळी १८ हजार ४०० लसी दाखल झाल्या. जिल्हा परिषदेच्या आरोग्य भांडारातून तातडीने जिल्ह्यातील २७४ केंद्रांना लसीचे वाटप करण्यात आले. दुपारनंतर लसीकरणाला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत बहुतांश केंद्रांवरील लस संपली. उर्वरित ठिकाणी शिल्लक लसी गुरुवारी तासाभरात संपतील, अशी परिस्थिती आहे.
चौकट
लसीचे पोर्टलही बंद
जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी केवळ सात हजार पाचशे लसी आल्या होत्या. सांगलीतील दोन केंद्रे, तर इस्लामपूर, विटा आणि कवलापूर अशा पाच ठिकाणी लसीकरण सुरू आहे. त्यांचीही ऑनलाईन नोंदणी सध्या होत नाही. लसीचे पोर्टलही बंद करण्यात आले आहे. शिल्लक लस आज नोंदलेल्या नागरिकांना देण्यात आली. उद्यापासून लसीकरणात खंड पडणार आहे.