देशासाठी सांगली जिल्ह्यातल्या १८६ वीरांचे बलिदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:28 PM2018-08-14T23:28:45+5:302018-08-14T23:28:49+5:30
अशोक डोंबाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतरही देशसेवेसाठी जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी मोलाचे योगदान दिले आहे. गेल्या ७० वर्षांत जिल्ह्यातील १८६ जवानांनी भारताच्या रक्षणासाठी बलिदान दिले आहे. आजही लष्कर, नौसेना, वायुसेना या तीनही दलात जिल्ह्यातील ६ हजार ५०० जवान सीमेवर शत्रूंशी दोनहात करीत असून, आजी-माजी ८० सैनिकांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावीर चक्र, वीर चक्र आदी शौर्यपदकांनी गौरवही केला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुध्द चळवळीत पाच शहीद झाले आहेत. १९४८ पासून ते आजअखेरचा इतिहास पाहिल्यास, प्रत्येक युध्दात सांगली जिल्ह्यातील सैनिकांनी मोठी कामगिरी करून देश रक्षण करताना स्वत:चे बलिदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान, चीन व श्रीलंकेमधील बंडखोरांबरोबर झालेल्या युध्दात तसेच अतिरेक्यांबरोबर झालेल्या लढ्यांत आजपर्यंत जिल्ह्यातील १८६ जवानांनी बलिदान दिले. देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आजपर्यंत विविध पदकांनी ७३ जणांना सन्मानित केले आहे. १९६२ मध्ये भारत-चीन युध्दात आठ वीरांनी प्राण खर्ची घातले. १९७१ मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युध्दात शहीद झालेले मणेराजुरीचे जवान पांडुरंग साळुंखे यांना मरणोत्तर महावीर चक्र पदकाने गौरविण्यात आले. जिल्ह्यात आजपर्यंत वीर चक्र पदकाने ८, शौर्य पदकाने १, सेना, नौसेना पदकाने २४ माजी आणि सहा आजी सैनिकांचा गौरव केला आहे. युध्द सेवा पदकाने १, अतिविशिष्ट सेवा पदकाने ५ व मिशन इन डिस्पॅच शौर्य पदकाने ३० जवानांना सन्मानित केले आहे. अति विशिष्ट सेवा पदक एका आजी सैनिकाने आणि सहा माजी सैनिकांनी पटकाविले आहे.
सांगली जिल्ह्यातील माजी सैनिकांची संख्या १९ हजार ४८७ इतकी असून, दिवंगत सैनिकांच्या पत्नींची संख्या पाच हजार ४६१ इतकी आहे. वीर पत्नी ८१ आणि वीर माता १५, तर वीर पित्यांची संख्या सहा आहे. दुसऱ्या महायुध्दातील सैनिक व विधवांची ७७१ संख्या आहे. सीमेच्या रक्षणासाठी आजही सांगली जिल्ह्यातील सहा हजार ते सात हजार सैनिक कार्यरत असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन सुनील गोडबोले यांनी दिली.
स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब पाटील यांनी सांगितले की, स्वातंत्र्यपूर्व चळवळीतही सांगली जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे. सुमारे पाच हजारहून अधिक ज्ञात, अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी चळवळीत सहभाग घेतला. स्वातंत्र्य चळवळीत अनेक ज्ञात-अज्ञातांनी सहभाग घेतला. त्यामध्ये सुमारे पाच हजार स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपट देण्यात आले. सुरुवातीला जे स्वातंत्र्यसैनिक अपंग, निराधार होते, त्यांना दीडशे रुपये मानधन देण्यात येत होते. १९७० च्या सुमारास स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन योजना लागू करण्यात आली. आता यात वाढ झाली आहे.
सैन्यातील टक्का : घसरतोय
सैन्यदलात जाणाºयांची संख्या घटत आहे, ही चिंतेची बाब आहे. सैन्यदलाबाबत तरुणांमध्ये गोडी निर्माण झाली पाहिजे, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करीत आहोत. मी माझ्यापासून सुरुवात केली आहे. माझी कन्या हिमीका कल्याणी मेजर असून ती सध्या हैदराबाद येथे कार्यरत आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा सैनिक कल्याणचे कर्नल बी. डी. कल्याणी यांनी दिली.
ब्रिटिशांविरुध्दच्या युध्दात पाच स्वातंत्र्यसैनिक शहीद
ब्रिटिशांविरुध्द युध्दात पाच स्वातंत्र्यसैनिक शहीद झाले. यामध्ये हुतात्मा किसन अहिर, अण्णासाहेब पत्रावळे, बाबूराव जाधव, शेगाव (ता. वाळवा) येथील रंगराव (दादा) पाटील व किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर कंपनीतील कर्मचारी उमाशंकर रेवाशंकर पंड्या यांचा समावेश आहे.
माजी सैनिक, विधवा यांची संख्या
तालुका माजी सैनिक विधवा एकूण
आटपाडी ३०१ ७४ ३७५
जत १५०९ ५३३ २०४२
क़महांकाळ २९७२ ११४४ ४११६
मिरज ३३१४ १६७७ ४९९१
शिराळा ३९२ ७६ ४६८
खानापूर ६८५ १६२ ८४७
तासगाव २७४७ ९८५ ३४५९
पलूस ४४४ १७३ ६१७
कडेगाव ४२७ १०५ ५३२
वाळवा १५०८ ५३२ २०४०
एकूण १४०२६ ५४६१ १९४८७