कृषी पंप वीज जोडणीसाठी १८७ कोटींच्या निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:57 PM2018-07-04T23:57:28+5:302018-07-04T23:57:32+5:30
सांगली : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार यापुढे कृषी पंपाचे कनेक्शन आता उच्चदाब वीज वितरण कंपनीद्वारेच दिले जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली असून सांगली जिल्ह्यातील १३ हजार ४८७ कृषिपंप धारकांसाठी १८७ कोटी ९५ लाखांची निविदा मागविल्या असल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकºयांच्या गरजेनुसार दहा ते पंचवीस केव्हीए क्षमतेच्या छोट्या थ्री फेज वितरण रोहित्राद्वारे वीज जोडणी मिळणार आहे. एका रोहित्रावर फक्त एक किंवा दोन कृषिपंप असणार आहेत.
प्रचलित पध्दतीनुसार शेतीला ६३ व १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रावरुन वीजपुरवठा होतो. एका रोहित्रावर १५ ते २० शेतीपंपांना वीजपुरवठा केला जात असल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होणे, बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होणे, रोहित्र जळणे तसेच तांत्रिक गळती वाढणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रासाठी उच्च्दाब वितरण प्रणाली राबविण्याचे धोरण आखले आहे.
शेतकºयांच्या विहिरीपर्यंत उच्च दाबाची वाहिनी उभारुन वीज जोडणी दिली जाणार आहे. ७.५ अश्वशक्ती जोडभारासाठी दहा केव्हीएचे, दहा अश्वशक्तीसाठी १६, तर त्याहून अधिक भार किंवा शेजारी दुसरे शेतकरी असल्यास २५ केव्हीए क्षमतेचे थ्री फेज रोहित्र खांबावरच बसविले जाणार आहे. त्याच खांबावर रोहित्राच्या खाली मीटरपेटी बसवून जोडणी दिली जाणार आहे.
सांगली जिल्ह्यातील १३ हजार ४८७ प्रलंबित कृषिपंप जोडण्यांसाठी १८७ कोटी ९५ लाखाच्या निविदा मागविल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच संपूर्ण जोडण्या उच्चदाब वितरण प्रणालीतूनच मिळणार आहेत.
नवीन प्रणालीचे फायदे
लघुदाब वाहिनीचे जाळे नसल्यामुळे बिघाडाचे प्रमाणात कमी होऊन अखंडित व शाश्वत वीजपुरवठा मिळणार आहे.
उच्चदाब वाहिनी उपकेंद्रातून सर्किट ब्रेकरद्वारे नियंत्रित होत असल्याने विजेची तार तुटल्यास वीजपुरवठा उपकेंद्रातून त्याक्षणास बंद होऊन वीज वाहिनी तुटून होणाºया अपघातात घट होईल.
उच्चदाब वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी होण्याचा धोका नाही. लघुदाब वाहिनी नसल्याने योग्य दाबाने वीजपुरवठा.
प्रत्येक रोहित्रावर एक किंवा दोन शेतकरी असल्यामुळे शेतकºयांमध्ये रोहित्र स्वामित्वाची भावना निर्माण होईल. त्यामुळे या रोहित्रावरुन अनधिकृत वीज जोडणी होणार नाही. तसेच रोहित्र जळण्याच्या प्रमाणातही घट होईल.