सांगली जिल्ह्यातील १९१ एसटी बसेस कालबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:55 PM2019-07-01T13:55:08+5:302019-07-01T13:56:06+5:30
सांगली जिल्ह्यात ८२६ एसटी बसेसपैकी दहा वर्षावरील १९१ बसेस असून, या कालबाह्य गाड्यांमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या, या प्रशासनाच्या धोरणामुळे जिल्ह्याची लाल परी सध्या संकटात सापडली आहे.
अशोक डोंबाळे
सांगली : जिल्ह्यात ८२६ एसटी बसेसपैकी दहा वर्षावरील १९१ बसेस असून, या कालबाह्य गाड्यांमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या, या प्रशासनाच्या धोरणामुळे जिल्ह्याची लाल परी सध्या संकटात सापडली आहे.
एसटी महामंडळाला नियोजनशून्यतेमुळे तोट्याचा सामना करावा लागतो. अशाही परिस्थितीत जास्त उत्पन्न देणारे आगार म्हणून सांगली जिल्ह्यातील बहुतांशी आगारांची ओळख आहे. जिल्ह्यातील दहा आगारांमध्ये दोन वर्षांपासून नवीन एकही बस आलेली नाही. यामुळे लांबच्या मार्गावरही जुन्याच बसेस पाठवाव्या लागत आहेत.
महामंडळाच्या नियमानुसार तीन लाख किलोमीटरपेक्षा कमी पळालेल्या बसच लांब पल्ल्याच्या मार्गावर पाठविण्याचा नियम आहे. परंतु, मागील दोन वर्षात एकाही बसची खरेदी झालेली नाही. यामुळे सध्या एसटीच्या ताफ्यातील ८२६ बसेसपैकी ९५ टक्के बसेस तीन लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावलेल्या आहेत. सांगली, मिरज आगारातून रोज पुणे, नाशिक, नांदेड, सोलापूर, परभणी, अहमदनगर, बारामती मार्गावर बसेस धावत आहेत.
तीन लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावलेल्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडता येत नाहीत. पण, बसेसच नसल्यामुळे नियम मोडून चार ते पाच लाख किलोमीटर धावलेल्या आणि पाच ते सहा वर्षाच्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर जात आहेत. जिल्ह्यातील आगारांकडे सध्या ८२६ बसेस आहेत. त्यापैकी १९१ बसेस दहा ते तेरा वर्षे वापरलेल्या आहेत. नवीन बसेस मिळत नसल्याने जुन्याच बसेसना दुरूस्त वापरल्या जात आहे. या बसेसही रोज १०० ते २०० किलोमीटर अंतर धावून येत आहेत. या बसेस कधी रस्त्यातच बंद पडत आहेत, तर कधी गळक्या छतामुळे पावसाचे पाणी प्रवाशांच्या अंगावर पडत आहे.