हिवताप विभागाने महिन्यात पकडले ५९१ डास! ; ‘क्युलेक्स’ डासांची संख्या सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 11:28 PM2019-12-21T23:28:41+5:302019-12-21T23:33:18+5:30
शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात वर्षभरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुण्याचे ५२७ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक रुग्णांची संख्या यावर्षी झाल्याने प्रशासनाकडूनही त्यावर कार्यवाही सुरू आहे.
शरद जाधव ।
सांगली : जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले असताना चिकुनगुण्या झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर डासांमुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी व त्यांची घनता तपासण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात हिवताप विभागाने तांत्रिक तपासणीसाठी विविध जातींचे ५९१ डास पकडले असून, त्याआधारे ज्या त्या भागात असलेले आजार व त्यावरील उपाययोजनेसंदर्भात प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे.
डेंग्यूसह चिकुनगुण्या, मलेरियासह इतर आजारांचे मूळ कारण डास असल्याने प्रशासनाने डास पकडण्याची मोहीम राबविल्याचा भास होत असला तरी, त्यात तथ्य नसून, तांत्रिक तपासणीसाठी त्या त्या भागात कोणत्या डासांची संख्या अधिक आहे, या डासांमध्ये कोणता रोग पसरविण्याची क्षमता आहे, याचा अहवाल तयार करण्यासाठी डासांची तपासणी केली जाते.
शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात वर्षभरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुण्याचे ५२७ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक रुग्णांची संख्या यावर्षी झाल्याने प्रशासनाकडूनही त्यावर कार्यवाही सुरू आहे.
जिल्ह्यात एडीस एजिप्तीया, अॅनाफिलीस व क्युलेक्स डासांचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते. नोव्हेंबर महिन्यात केलेल्या तपासणीत जिल्ह्यात क्युलेक्स डासांचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले आहे. त्यानंतर अॅनाफिलीस डासांची संख्या असून, डेंग्यूला कारणीभूत असणाºया एडीस डासांची संख्या तिस-या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील १६ प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत १६ गावांमध्ये प्रशासनाने हा सर्व्हे केला आहे.
असे पकडले जातात डास --- डास अळींचे प्रमाण आढळलेल्या भागात अडीच तासांच्या कालावधित प्लास्टिकच्या नळीच्या माध्यमातून डास पकडले जातात. पकडलेले डास परीक्षा नळीत घेऊन त्याचे परीक्षण करून त्याचा अहवाल संबंधित ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिकेला दिला जातो, जेणेकरून संभाव्य रोगावर नियंत्रण मिळविणे त्यांना शक्य होईल. जिल्ह्यात कीटक संहारकांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जाते.
जिल्ह्यातील या भागात मोहीम
जिल्ह्यात संजयनगर, पेड, वड्डी, मिरज-खणभाग, सावळी, उमदी, रामपूर, अभयनगर-सांगली, कवठेपिरान, तुंग, वाझर, पलूस, मालगाव, आटपाडी, मौजे डिग्रज आणि बुधगाव या १६ गावांतील डासांची घनता तपासण्यात आली.
प्रशासनाकडून डास पकडून त्याची घनता काढली जाते. या तपासणीत आढळून येणाऱ्या डासांमुळे कोणता आजार होऊ शकतो याबाबत माहिती दिली जाते. ज्या त्या भागातील डासांची माहिती मिळाल्याने उपाययोजना करणे सोईचे होते.
- डॉ. विवेक पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी