Sangli: कर्जाच्या आमिषाने २ कोटी १९ लाखांची फसवणूक; ठाण्यातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:35 PM2024-09-30T12:35:08+5:302024-09-30T12:35:53+5:30
तासगाव (जि. सांगली ) : कोट्यवधी रुपये कर्जाचे आमिष दाखवून तब्बल २ कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार ...
तासगाव (जि. सांगली) : कोट्यवधी रुपये कर्जाचे आमिष दाखवून तब्बल २ कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिरीषकुमार देशपांडे, श्रीकांत चव्हाण, सोनल देशपांडे, सूर्यकांत नंदकिशोर शर्मा (सर्व रा. अरुणराव देशपांडे फ्लॅट नं. १४, बिल्डिंग नं. सी.डी-६३, मातृछाया बंगलोसमोर, श्रीरंग रोड, ठाणे) यांच्यावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दीपक नेताजीराव मोरे (रा. बिरणवाडी, ता. तासगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
१ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत तासगाव येथील सरस्वतीनगर (वासुंबे) येथे फिर्यादी दीपक मोरे यांना विविध फायनान्स कंपनीकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. मोरे यांचा विश्वास संपादन करीत त्यांच्या बँक खात्यामार्फत व रोख स्वरूपात २ कोटी २६ लाख १०० रुपये संशयितांनी घेतले.
मात्र, कोणत्याही फायनान्स कंपनीचे कर्ज मंजूर न करता संशयितांनी संगनमत करून फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोरे यांनी पैसे परत मागितले. तेव्हा ७ लाख रुपये ८ मे २०२४ पर्यंत टप्प्याटप्प्यात परत दिले. उर्वरित रक्कम २ कोटी १९ लाख १०० रुपये परत दिले नाहीत. मोरे यांना एसबीआय व डून व्हॅली फायनान्स ॲन्ड लेझीग लिमिटेड या फायनान्स कंपनीचे कर्ज मंजुरीचे बनावट पत्रक दिले. २ कोटी १९ लाख १०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मोरे यांनी फिर्याद दिली.