महापुरामुळे सांगलीत ४००० कोटींचे नुकसान; ९०% बाजारपेठ बंदच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 05:05 AM2019-08-18T05:05:10+5:302019-08-18T05:10:02+5:30
नेहमीच गर्दीने फुलणारी सांगलीची गणपतीपेठ महापुराच्या पाण्यात पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे.
सांगली : अभूतपूर्व अशा महापुरात जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रांचे सुमारे ४,००० कोटींचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकच नव्हेतर, सर्वसामान्य माणूनही उद्ध्वस्त झाला आहे.
नेहमीच गर्दीने फुलणारी सांगलीची गणपतीपेठ महापुराच्या पाण्यात पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. दुकानातील चिखल, पाण्याने भिजलेला माल काढण्यामध्येच व्यापारी व्यग्र आहेत. काही छोट्या दुकानदारांनी व्यवहार सुरू केले असले तरी नव्वद टक्के बाजारपेठ बंदच आहे. केवळ धान्य व्यापाऱ्यांचेच अंदाजे २५० कोटींवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
गणपती पेठेत धान्याचे मोठे व्यापारी असून, त्यांची गोदामेही तेथेच आहेत. शिवाय मसाले, कॉस्मेटिक व इतर साहित्याची दोनशेहून अधिक दुकाने आहेत. पुरामध्ये सर्वांत मोठे नुकसान गणपती पेठेचे झाले आहे. मिठापासून धान्यापर्यंत सारे काही पुराच्या पाण्यात भिजले आहे. धान्य कुजण्यास सुरुवात झाली आहे. कडधान्यांना कोंब फुटले आहेत. मसाल्याच्या पदार्थांचेही मोठे नुकसान झाले आहे. पेठेतील व्यापारी दुकाने आणि गोदामांमधील घाणीची स्वच्छता करण्यातच व्यग्र होते. किरकोळ दुकानदारांनी स्वच्छता करून व्यवहार सुरू केले आहेत. पण, त्यांचे प्रमाण केवळ १० टक्केच होते. सोमवारपासून येथील व्यवहार सुरळीत होतील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
धान्य व्यापारी व चेंबर आॅफ कॉमर्सचे संचालक अण्णासाहेब चौधरी म्हणाले, गणपती पेठेतील धान्य व्यापाºयांचेच जवळपास २५० कोटींचे नुकसान झाले आहे. हजारो क्विंटल गहू, ज्वारी, तांदूळ, कडधान्य भिजले आहे. उर्वरित व्यापाºयांच्या नुकसानीचा आकडा हजार कोटीपर्यंत जाईल. सर्वेक्षणानंतरच नुकसानीचे खरे आकडे समोर येणार आहेत. कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुरामुळे वाळवा, पलूस, मिरज, शिराळा तालुक्यातील ६९०० एकरावरील भाजीपाला १५ दिवस पाण्यात राहिल्याने पूर्णत: सडला आहे. यात उत्पादकांचे सुमारे ७० कोटींचे नुकसान झाले.
३५०० कोटींचा फटका : संजय पाटील
महापुरामुळे विविध क्षेत्रांतील नुकसान अंदाजे साडेतीन हजार कोटींच्या घरात आहे. ते पूर्ण भरून निघणार नसले तरी, पूरग्रस्तांना दिलासादायक मदत देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करून तातडीने निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी दिली.
रस्त्यांचे मोठे नुकसान
महापुराने सांगली जिल्ह्यात वीज, पाणीपुरवठा, संपर्क यंत्रणांसह रस्त्यांचीही मोठी हानी झाली. सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या रस्त्यांचे एकूण सुमारे २५0 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
महावितरणची ४७ कोटींची हानी
महापुराचा महापालिकेसह जिल्ह्यातील १०४ गावांना फटका बसला. चार तालुक्यांतील १६ उपकेंद्रांसह चार हजारांहून अधिक रोहित्रे, मीटर पाण्यात बुडाल्यामुळे बंद पडली होती. महावितरणचे ४७ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.