पुणे-मिरज-लोंढा मार्गासाठी ५४० कोटी-: क-हाड-चिपळूण, कोल्हापूर- वैभववाडी मार्गाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 11:23 PM2020-02-05T23:23:59+5:302020-02-05T23:26:06+5:30
कोल्हापूर-मिरज विद्युतीकरण पूर्ण होऊन या मार्गावर विद्युत इंजिनद्वारे प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. दुहेरीकरणाच्या कामासोबत नवीन प्रस्तावित लोणंद-बारामती, कºहाड-चिपळूण, फलटण-पंढरपूर व हातकणंगले-इचलकरंजी या नवीन रेल्वेमार्गांच्या सर्वेक्षणासाठी गतवर्षी प्रत्येकी दहा लाखांची तरतूद करण्यात आली होती.
सदानंद औंधे।
मिरज : केंद्रीय अर्थसंकल्पात यावर्षी पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी ५४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, क-हाड-चिपळूण, कोल्हापूर-वैभववाडी, हातकणंगले-इचलकरंजी या नवीन रेल्वेमार्गांच्या उभारणीसाठी निधीची तरतूद केली नसल्याने नवीन रेल्वेमार्गांचे काम रखडण्याची शक्यता आहे.
गतवर्षी रेल्वे अर्थसंकल्पात पुणे-मिरज दुहेरीकरणासाठी ५८५ कोटी रुपये व पुणे-मिरज-कोल्हापूर विद्युतीकरणासाठी १५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यावर्षी अर्थसंकल्पात पुणे-मिरज-लोंढा या ४६७ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ५४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूर-मिरज विद्युतीकरण पूर्ण होऊन या मार्गावर विद्युत इंजिनद्वारे प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. दुहेरीकरणाच्या कामासोबत नवीन प्रस्तावित लोणंद-बारामती, कºहाड-चिपळूण, फलटण-पंढरपूर व हातकणंगले-इचलकरंजी या नवीन रेल्वेमार्गांच्या सर्वेक्षणासाठी गतवर्षी प्रत्येकी दहा लाखांची तरतूद करण्यात आली होती.
यावर्षी अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद करून कोल्हापूर-वैभववाडीसह प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गाचे काम सुरू करण्याची मागणी होती. मात्र, बारामती-लोणंद मार्गासाठी तीन कोटी व कºहाड-चिपळूण, कोल्हापूर-वैभववाडी, हातकणंगले-इचलकरंजी या सर्वेक्षण पूर्ण झालेल्या नवीन रेल्वेमार्गांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही.
सर्व पॅसेंजर व डेमू रेल्वेगाड्यांत सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. मिरज व कोल्हापूर मॉडेल रेल्वेस्थानके निर्मितीसाठीही अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. मिरज-पंढरपूर मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या अतिशय कमी आहे. या मार्गावर रेल्वेगाड्या वाढविण्याकडे दुर्लक्ष आहे. पुणे-मिरज दुहेरीकरणासोबत या मार्गावर भिलवडी, नांद्रेसह पुण्यापर्यंत सात ठिकाणी उड्डाणपूल व आठ ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. मिरज-बेळगाव व मिरज-कोल्हापूर मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. कºहाड ते मिरजदरम्यान ताकारी-शेणोली दरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, सांगली ते ताकारी या मार्गावरील रेल्वेरूळ बदलण्यात येणार आहेत. मिरज स्थानकात पाणीपुरवठा व्यवस्था, विद्युतपुरवठा व्यवस्थेसाठी निधी देण्यात आला आहे. मिरज-पुणे, मिरज-कुर्डुवाडी मार्गांवर रेलपथ नूतनीकरण, उड्डाणपूल व भुयारी मार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
कोल्हापूर व मिरज या अ दर्जाच्या रेल्वे स्थानकात वायफाय सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर कोच इंडिकेटर, सरकता जिना या सुविधांसाठी प्रवाशांना पाठपुरावा करावा लागणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण वगळता कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील प्रवाशांच्या मागण्यांची दखल घेण्यात आलेली नाही.
यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात नवीन रेल्वेमार्गासाठी निधी मिळाला नसल्याने नवीन रेल्वेमार्गांचे काम रखडणार आहे. कोल्हापूर-वैभववाडी, कºहाड-चिपळूण या नवीन रेल्वेमार्गांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, हे काम सुरू झाले नाही तर अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
- सुकुमार पाटील, सचिव, रेल्वे कृती समिती.
रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेच्या पुणे विभागासाठी भरीव आर्थिक तरतूद केलेली नाही. मिरज, सांगली, सातारा, कोल्हापूर रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करावे, पॅसेंजर गाड्यांचे डबे वाढवावेत, या मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. रेल्वेच्या खासगीकरणाच्या धोरणाचा प्रवाशांना फटका बसणार आहे.
-किशोर भोरावात,
मिरज रेल्वे सल्लागार समिती सदस्य