दोन कोटींचा मुद्देमाल जप्त, ५० गुन्हेगार हद्दपार; सांगली जिल्हा पोलिसांची कारवाई
By संतोष भिसे | Published: November 14, 2024 03:26 PM2024-11-14T15:26:43+5:302024-11-14T15:31:16+5:30
८०२ जणांना अजामिनपात्र वारंट
सांगली : सांगली जिल्ह्यात निवडणूक काळात आतापर्यंत दोन कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ५० गुन्हेगारांना हद्दपार केले असून ८०२ जणांना अजामिनपात्र वाॅरंट बजावण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी ही माहिती दिली.
घुगे म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदारसंघांत एकूण आठ स्ट्राँग रूम तयार केल्या आहेत. तेथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक शांततेत, मुक्त व नि:पक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. आतापर्यंत नऊ अग्नीशस्त्रे जप्त केली आहेत. २७ प्रकारची अन्य तीक्ष्ण हत्यारे जप्त केली आहेत. जिल्ह्यात सुमारे २४०० परवानाधारक शस्त्रे असून निवडणुकीमुळे सर्व शस्त्रे जमा करुन घेण्यात आली आहेत. यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या सर्व आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. विशेषत: करून झोपडपट्टीदादांचा बंदोबस्त केला असून मोका कायद्यांतर्गतही कारवाया केल्या आहेत.
घुगे म्हणाले, ९ आंतरराज्य तपासणी नाक्यांवर संशयास्पद बाबींची तपासणी सुरु आहे. आतापर्यंत दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ९२ लाखांची रोकड, ६५ लाख रूपयांपेक्षा जास्त किंमतीचे अवैध मद्य, ५३ लाख रूपयांहून जास्त किंमतीचा गुटखा, सात लाख रूपयांहून जास्त किंमतीचा गांजा आणि तीन लाखांचे दागिने यांचा समावेश आहे. बंदोबस्तासाठी लष्कराच्या आठ कंपन्या सज्ज आहेत.
घुगे म्हणाले, निवडणुकीसंदर्भातील पाच गुन्हे विविध ठिकाणी दाखल झाले आहेत. निवडणुकीत समन्वयासाठी बिनतारी संदेश, मोटर परिवहन विभाग यांचाही उपयोग करून घेण्यात येत आहे. पोलिसांना टपाली मतदानाची सुविधा दिली आहे. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचलन केले आहे.