सांगलीतील 2 दुकानांना महापालिकेकडून टाळे; परवाना न घेतल्याने कारवाई, व्यापाऱ्यांत नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 07:48 PM2022-09-20T19:48:08+5:302022-09-20T19:49:27+5:30
लोकशाही दिनामध्ये विनापरवाना व्यवसायाबाबत तक्रार आल्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी कारवाईचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते.
सांगली - गणपती पेठेतील विनापरवाना सुरू असणाऱ्या दोन दुकानांना महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून टाळे ठोकण्यात आले. आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशाने आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे आणि पथकाने ही कारवाई केली. गणपती पेठेत दीनानाथ नाट्यगृहासमोरील बोळामध्ये विजय सेवांनी यांचा कुशन व्यवसाय आणि भूषण साने यांचे रंग विक्रीचा व्यवसाय आहे.
लोकशाही दिनामध्ये विनापरवाना व्यवसायाबाबत तक्रार आल्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी कारवाईचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. यानुसार वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणिल माने, वैभव कुदळे, कर्मचारी रवि यादव, सचिन सावंत, रफिक मोमीन यांच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करीत विनापरवाना सुरू असणाऱ्या दोन आस्थापना सील केल्या. महापालिका क्षेत्रात विनापरवाना व्यवसाय सुरू असतील तर त्यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाचा परवाना घ्यावा अन्यथा अशा आस्थापना, दुकानांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आंबोळे यांनी दिला.
व्यापारी संघटनेचा विरोध
महापालिकेने ऐन सणासुदीच्या तोंडावर व्यापाऱ्यांवर कारवाई सुरू केल्याने व्यापारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली. व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच व्यवसाय परवान्याला स्थगिती आहे. तरीही महापालिकेने कारवाई करीत त्यांच्या आदेशाचा अवमान केला. आंबोळे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून आदेशाची माहिती दिली, पण त्यांनी कुठला आदेश, मी ओळखत नाही, असे उद्धट उत्तर दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्याची भाजप नेत्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी शहा यांनी केली.