५३० वर्षांपूर्वीच्या १३ मूर्ती -- जैन संस्कृतीच्या इतिहासावर प्रकाशझोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 12:04 AM2020-02-09T00:04:12+5:302020-02-09T00:04:41+5:30
या मूर्ती सुस्थितीत होत्या. मूर्तींच्या पिठासनावर लेख असून, त्यामध्ये संवत्सर १५४८ चा उल्लेख आहे. म्हणजेच १४९० मध्ये तयार केलेल्या हा मूर्ती आहेत, असे आढळून आले. कुमठेकर यांनी प्रथमदर्शनी मूर्तींचा इतिहास मोठा असून, तो सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले.
सांगली : मालगाव (ता. मिरज) येथे जैन मंदिराच्या पायाखुदाईवेळी ५३० वर्षांपूर्वीच्या जैन पार्श्वनाथ व चंद्रप्रभूंच्या १३ मूर्ती आढळल्या. मूर्तींच्या पीठासनावर लेख आढळून आले असून, त्यावर १४९० वर्षाची नोंद आहे. त्यामुळे या परिसरातील प्राचीन जैन संस्कृतीचा प्रभाव व इतिहास यांच्या अभ्यासाला चालना मिळाली आहे.
मालगाव येथे जुने जैन मंदिर पाडून नवे मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. या मंदिराची पायाखुदाई केली जात असताना, सकाळी साडेअकरा वाजता त्याठिकाणी एकापाठोपाठ एक अशा १३ मूर्ती आढळून आल्या. याबाबतची माहिती मंदिर समितीच्या प्रमुखांनी इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांना दिली. कुमठेकर यांनी मालगावमध्ये जाऊन या मूर्तींची पाहणी केली.
याठिकाणी दोन चंद्रप्रभूंच्या आणि उर्वरीत पार्श्वनाथांच्या मूर्ती होत्या. ७ मूर्ती संगमरवरी, १ दगडी व ४ पितळी मूर्ती आढळल्या. या मूर्ती सुस्थितीत होत्या. मूर्तींच्या पिठासनावर लेख असून, त्यामध्ये संवत्सर १५४८ चा उल्लेख आहे. म्हणजेच १४९० मध्ये तयार केलेल्या हा मूर्ती आहेत, असे आढळून आले. कुमठेकर यांनी प्रथमदर्शनी मूर्तींचा इतिहास मोठा असून, तो सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले.
मिरज तालुक्यात अनेक ठिकाणी जैन समाजाचा प्राचीन प्रभाव आढळून येतो. त्याला पृष्ठी देणारे अनेक पुरावेही संशोधकांच्या हाती लागले आहेत. त्यात आता मालगावमधील मूर्तींची भर पडली आहे. इतिहास संशोधकांना, संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांना या मूर्तींचा शोध महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मिरज, सांगली परिसरावर फार पूर्वीपासून जैन संस्कृतीचा प्रभाव आहे. आजही तो असला तरी, त्याचा इतिहास फार मोठा आहे.
बारकाईने होणार अभ्यास
संशोधकांमार्फत मूर्तींचा बारकाईने अभ्यास करण्यात येणार असून, त्यातून अनेक गोष्टी पुढे येतील. एखाद्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाचवेळी मूर्ती सापडण्याची घटना प्रथमच घडली आहे, असे कुमठेकर म्हणाले.