वसंतदादा बँकेच्या २० कोटीच्या मालमत्तेचा लवकरच लिलाव, वर्षभरात देणी परत देणार
By शीतल पाटील | Published: April 19, 2023 07:00 PM2023-04-19T19:00:06+5:302023-04-19T19:00:23+5:30
१२ कोटीची रक्कम विनादाव्याची
सांगली : वसंतदादा शेतकरी बँकेकडील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी २० कोटीच्या २५ मालमत्तांचा लिलाव काढला जाणार आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या वर्षभरात ठेवीदारांच्या ७५ कोटीची मुद्दल परत करण्याचा प्रयत्न असल्याचे बँकेच्या प्रशासक तथा सहाय्यक निबंधक स्मृती पाटील यांनी बुधवारी सांगितले.
पाटील म्हणाल्या की, वसंतदादा बँकेकडे १५३ कोटीचे देणी आहेत. ५६ कोटीची येणेबाकी आहे. बँकेकडे मार्च २०२३अखेर २८ कोटी ९० लाख रुपयांची वसुली झाली आहे. या रकमेचे वाटप राज्य शासन व सहकार विभागाच्या निर्देशाने केले जाणार आहे. तसा प्रस्तावही लवकरच आम्ही पाठविणार आहोत.
यंदाच्या आर्थिक वर्षात ४० कोटीच्या वसुलीचे उद्दिष्ट आहे. लवकरच २५ मालमत्तांचा लिलाव करणार आहोत. त्यातून २० कोटीची कर्जवसुली होईल. बँकेच्या काही मालमत्तांचाही लिलाव होणार आहे. त्यातून २० कोटी मिळतील. मार्चअखेर शिल्लक २९ कोटी आहेत. त्यामुळे वर्षभरात बँकेच्या ठेवीदारांचे ७५ कोटी रुपये परत करण्याचा आराखडा तयार केला आहे. ठेवीदारांची मुद्दल देण्यात कसलीही अडचण राहणार नाही. बँकेच्या ३६ शाखामधील खातेदारांचे एकत्रिकरण सुरू केले आहे. त्यामुळे खातेदारांची देणी किती आहेत, याचा आकडा समोर येईल, असेही पाटील म्हणाल्या.
१२ कोटीची रक्कम विनादाव्याची
ठेवी विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी)कडून एक लाखापर्यंतच्या ठेवी परत करण्यात आल्या. अजूनही ८८ हजार खातेदारांनी ठेवीसाठी विमा क्लेम केलेला नाही. या खातेदारांची जवळपास १२ कोटीची रक्कम डीआयसीजीसीकडे शिल्लक असल्याचे पाटील यांनी सांगितले.