सांगली महापालिकेच्या पाणीपुरवठाकडून २० कोटीची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:34 AM2019-04-12T11:34:15+5:302019-04-12T11:34:51+5:30
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पहिल्यांदाच पाणीपट्टी वसुलीत २० कोटीचा टप्पा गाठला. गतवर्षीच्या तुलनेत तीन कोटी १३ लाख रुपयांची जादा वसुली झाली.
सांगली : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पहिल्यांदाच पाणीपट्टी वसुलीत २० कोटीचा टप्पा गाठला. गतवर्षीच्या तुलनेत तीन कोटी १३ लाख रुपयांची जादा वसुली झाली. तसेच दोन कोटी रुपयांच्या थकीत कर वसुलीसाठी ८१६ नळ कनेक्शन्स तोडण्यात आल्याची माहिती विभागप्रमुख काका हलवाई यांनी दिली.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे चालू व मागील अशी ३७ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकी होती. त्यापैकी २० कोटी ३ लाख ८१ हजार रुपये वसूल करण्यात यश आले आहे. यात सांगली व कुपवाडमधून १४ कोटी ५४ लाख, तर मिरजेतून ५ कोटी ४९ लाख रुपये वसूल झाले. गतवर्षीच्या तुलनेत ३ कोटी १३ लाख रुपयांची जादा वसुली झाली आहे.
आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त मोसमी बर्डे, स्मृती पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाला यंदा २५ कोटी वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. थकीत ३७ कोटीपैकी बंद नळ कनेक्शन्स, झोपडपट्टीमधील कनेक्शन्स, तसेच पडीक मालमत्तांकडे पाणीपुरवठ्याची ६ कोटी ३४ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही वसुली होण्यास विलंब होणार आहे. त्यातच ऐन मार्चमध्ये कृष्णा नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाºयांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्याचाही वसुलीवर परिणाम झाला.
त्यातच शेवटच्या टप्प्यात निवडणूक कामासाठी कर्मचारी गेल्याने वसुलीचे प्रमाण कमी झाले होते. वसुली विभागाचे प्रमुख काका हलवाई, वॉरंट आॅफिसर इब्राहिम पखाली, राजेंद्र पाटील, तुकाराम पाटील, नरेंद्र माळी, राम शिकलगार यांच्या प्रयत्नामुळे पहिल्यांदाच पाणीपुरवठा विभागाने २० कोटीचा टप्पा पार केला.