ऑनलाईन गंडा घालणाऱ्यांना दणका, सायबर पोलिसांकडून २० कोटी गोठवले

By शीतल पाटील | Published: August 21, 2023 08:50 PM2023-08-21T20:50:20+5:302023-08-21T20:50:26+5:30

टेलिग्राम ग्रुपव्दारे फसवणुक: बेरोजगारांना कमिशनचे आमिष

20 crores frozen by cyber police to crack down on online fraudsters | ऑनलाईन गंडा घालणाऱ्यांना दणका, सायबर पोलिसांकडून २० कोटी गोठवले

ऑनलाईन गंडा घालणाऱ्यांना दणका, सायबर पोलिसांकडून २० कोटी गोठवले

googlenewsNext

सांगली : सोशल मिडीयाच्या माध्यमातून जादा परताव्याचे आमिष दाखवित गंडा घालणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सांगलीच्या सायबर पोलिसांनी चांगलाच चाप लावला आहे. गेल्या एक महिन्यात ऑनलाईन भामट्यांची सुमारे २० कोटी रुपयांची रक्कम गोठविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. तरीही ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकाराला पूर्णत: आळा बसलेला नाही. त्यासाठी नागरिकांनीच जागरुक होऊन आर्थिक व्यवहार केले पाहिजे.

जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. भामट्याकडून कधी व्हिडीओ लाईक करण्यासाठी पैशाचे आमिष दाखविले जाते. तर कधी ट्रेडिंगमधील गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याचे आश्वासन देत नागरिकांना गंडा घातला जातो. हा घोटाळा करण्यासाठी सायबर गुन्हेगार व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम सारख्या एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करतात. ते युजर्सना एका अज्ञात नंबरवरून मेसेज टाकतात. वापरकर्ते टेलीग्राम गटांमध्ये जोडले जातात, ज्यात आधीपासूनच अनेक सदस्य आहेत. येथे यूजर्सना जास्त उत्पन्न देण्याचे आश्वासन देऊन विशिष्ट रक्कम भरण्यास सांगितली जाते. एकदा रक्कम भरली की ती परत मिळण्याची सुतराम शक्यता उरत नाही. ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक तक्रारी सांगली सायबर पोलिस ठाण्याकडे आल्या होत्या. सायबरचे निरीक्षक संजय हारुगडे व त्यांच्या पथकाने तक्रारींची तातडीने दखल घेत सायबर गुन्हेगारांच्या बँक खात्याचा शोध घेतला. गेल्या महिन्याभरात गुन्हेगारांचे सुमारे २० कोटी रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे.

सायबरचे पोलीस निरिक्षक संजय हारुगडे, पोलीस उपनिरिक्षक रोहिदास पवार, करण परदेशी, श्रीधर बागडी, विवेक साळुंखे,अजय पाटील, स्वप्नील नायकोडे, कॅप्टन गुंडवाडे, इम्रान महालकरी, रुपाली पवार, रेखा कोळी, सलमा इनामदार यांच्या सामुहिक प्रयत्नांमुळे सायबर फसवणूकीची प्रकरणे उघड झाली आहेत.

बनावट ॲप डाऊनलोड करू नका
सायबर गुन्हेगाराकडून बनावट ॲप तयार केलेले असते. त्या ॲपच्या माध्यमातून सर्व व्यवहार होतो. वापरकर्त्याला एखाद्या ॲपची लिंक पाठविण्यात येते. त्याला २० ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखविले जाते. ॲप डाऊनलोड केल्यानंतर वापरकर्त्याची माहिती विचारले जाते. बँक खात्यासंबंधीची माहिती विचारून गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते. ही रक्कम काही लाखांच्या घरात पोहोचल्यानंतर ॲप आणि टेलिग्राम व व्हॉटस्ॲपवरील ग्रुप डिलिट केला जातो.

Web Title: 20 crores frozen by cyber police to crack down on online fraudsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.