मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील २० महिला डॉक्टर्स कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 02:23 PM2021-12-28T14:23:26+5:302021-12-28T14:24:34+5:30
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २० विद्यार्थिनी डॉक्टर्स कोरोनाबाधित झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २० विद्यार्थिनी डॉक्टर्स कोरोनाबाधित झाल्या आहेत. सोमवारी सायंकाळी चाचणी अहवाल आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
वीस बाधितापैकी पंधरा आंतरवासिता डॉक्टर आहेत, तर पाच एमबीबीएसच्या तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत. त्याना विलगीकरण कक्षात ठेवले असून उपचार सुरु आहेत. पंधरा डॉक्टर कोरोना कक्षात ड्युटी करत होत्या. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने आणि त्रास होऊ लागल्याने आरतीपीसीआर चाचणी करण्यात आली. सोमवारी सायंकाळी त्याचा अहवाल सकारात्मक आला. याच दरम्यान वसतिगृहातील आणखी पाच विद्यार्थिनींच्या चाचण्यांचा अहवालही सकारात्मक आला. ड्युटीवरील महिला डॉकटरांच्या संपर्कात आल्याने त्यादेखील बाधित झाल्याचा संशय आहे.
दरम्यान, कोरोना कक्षातील महिला डॉक्टरांना अन्य कक्षात ड्युटी देण्यात आलेली नव्हती, त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याची श्यक्यता नाही, पण त्यांच्या संपर्कात आलेल्या काही विद्यार्थी-विद्यार्थिनी व सहकाऱ्यांनी स्वाबचे नमुने दिले आहेत. त्यांचा चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहे. दरम्यान, रुग्णालयात सध्या सुमारे तीस कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रुग्णसंख्या आटोक्यात आलेली असताना मोठ्या संख्येने डॉक्टर बाधित झाल्याने अस्वस्थता पसरली आहे.