लिंबखिंडीत विचित्र अपघातात २० जखमी

By admin | Published: January 13, 2015 11:29 PM2015-01-13T23:29:13+5:302015-01-14T00:31:14+5:30

अपघातातील बहुतांश जखमी सांगली जिल्ह्यातील

20 injured in a strange accident in Limbakhind | लिंबखिंडीत विचित्र अपघातात २० जखमी

लिंबखिंडीत विचित्र अपघातात २० जखमी

Next

किडगाव : पुणे-बंगलोर महामार्गावर लिंंबखिंंड, ता. सातारा येथे मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात वीस जखमी झाले. दरम्यान, या अपघातानंतर येथे वाहतुकीची कोंडी झाली होती.
रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लिंंबखिंंड येथील चढावर रस्त्यावर असणाऱ्या जेसीबीला एसटी व बोलेरो गाडीची धडक बसली. यामध्ये बोलेरो व एसटी बसमधील वीस प्रवासी जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग मदत केंद्राच्या रुग्णवाहिकाही तत्काळ रवाना झाल्या. त्यातून जखमींना तातडीने उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, लिंबखिंड येथे झालेला अपघात मोठा असून, जखमींना जिल्हा रुग्णालयात आणले जाणार असल्याची माहिती मिळताच सातारा उपविभागाचे पोलीस उपधीक्षक डॉ. संदीप पखाले, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे दाखल झाले. त्यांनी येथे जखमींच्या उपचारासाठी यंत्रणा तत्काळ उपलब्ध करून दिली.
दरम्यान, अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्यातच अडकून पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. यानंतर पोलिसांनी क्रेनच्या साह्याने गाड्या बाजूला घेऊन वाहतूक पूर्ववत केली. दोन्ही वाहनांचे चालक जेसीबीला धडक बसल्याचे सांगत होते. मात्र, घटनास्थळी जेसीबी आढळून आला नाही. अपघातातील जखमींची नावे घेण्याची व गुन्हा नोंदविण्याची करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सातारा तालुका पोलीस ठाण्यात सुरू होती. (प्रतिनिधी)

अपघातातील बहुतांश जखमी सांगली जिल्ह्यातील
विटा आगाराची विटा-पिंपरी-चिंचवड या बस (एमएच १४ - बीटी २९४१) मधील वीस प्रवासी जखमी झाले. यामध्ये उमेश रामचंद्र जाधव (वय ३८, रा. आटपाडी, जि. सांगली), अमर अशोक दोडके (वय ३३, रा. हणमंतनगर, विटा) हे गंभीर जखमी झाले. मनोहर बाबुराव पवार (वय ७२, रा. वडूज, जि. सातारा), लक्ष्मी चंद्रकांत लोंंढे (वय ४५, रा. खडकी, पुणे), समीर संतोष भोसले (वय २९, रा. भुर्इंज, ता. वाई), अंकुशराव चंद्रकांत जाधव (वय २९, रा. चिंचोली, ता. शिराळा, जि. सांगली), नीलेश जाधव (वय ३४, रा. उल्हासनगर) विनोद देशमुख (वय २९, रा. अंबरनाथ पूर्व), शरद विठोबा पवार (वय ३३, रा. तडसर, वांगी, ता. कडेगाव), भगवान दाजी पवार (वय १२, भारतीनगर, पुणे), इकबाल शब्बीर मोमीन (वय २४, रा. डोळेगाव, ता. सातारा), संभाजी
नरसिंह गाडे (वय ३४, रा. साधलापूर, जि. परभणी), विजय विठ्ठल राठोड (वय ३९, येरवडा, पुणे) यांचा समावेश
आहे. काही जखमींची नावे मिळू शकली नाहीत.
चारचाकीतून (एमएच १२ - ११७७) प्रवास करणारे नाना मारुती गावडे (वय २८, रा. येरवडा, पुणे) आणि दत्तात्रय बापूसाहेब राणे (वय ४२) हे अपघातात जखमी झाले.

वाईतही विचित्र अपघात; एक ठार
वाई : वाई येथील औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या चांदणी चौकात मंगळवार, दि. १३ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात सदाशिव दगडू शिंदे यांचा मृत्यू झाला. बंद जीप चालू करत असताना अचानक गाडी सुरू झाल्याने ते जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
वाई पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव दगडू शिंदे (वय ५२, रा़ सोनगांव ता. सातारा) याचा जीप (एमटीएस ६६६८) वाई येथील औद्योगिक वसाहतीतील चांदणी चौकात आला असता बंद पडला. सदाशिव शिंदे हे गाडी चालू होत नसल्याने गाडीचे बॉनेट उघडून थेट पान्ह्याच्या साह्याने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी अचानक गाडी सुरू झाली.
त्यावेळी गाडी गिअरमध्ये असल्याने चालू झालेल्या गाडीचा जोरदार धक्का बसला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची वाई पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पी़ एऩ खरात तपास करीत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: 20 injured in a strange accident in Limbakhind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.