सांगलीत कुरिअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत एकाला २० लाखांचा गंडा
By शरद जाधव | Published: November 21, 2023 06:10 PM2023-11-21T18:10:08+5:302023-11-21T18:11:05+5:30
नार्कोटिक्स विभागाकडे तक्रार करणार असल्याचे सांगत प्रकार
सांगली : मुंबई ते तैवान पाठविण्यात आलेल्या कुरिअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत नार्कोटिक्स विभागाकडे तक्रार करण्याची धमकी देत एकाला २० लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अनिकेत अरूणकुमार कदम (सध्या रा. पुणे, मूळ रा. दक्षिण शिवाजीनगर, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कदम यांच्या वडिलांना अज्ञाताने फोन करून ही फसवणूक केली.
फिर्यादी कदम यांच्या वडिलांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. यावेळी तुमचे आधारकार्ड वापरून एक कुरिअर बुक करण्यात आले असून, मुंबई ते तैवान पाठविण्यात येणाऱ्या या कुरिअरमध्ये कपडे, पासपोर्ट, क्रेडिट कार्ड आणि ड्रग्ज सापडल्याचे सांगितले. याबाबत नार्काेटिक्स विभागागडे तक्रार करू, असे त्यांना सांगण्यात आले.
यावेळी स्काईप ॲप मोबाइलवर घेण्यास सांगून त्यावर पुढील कारवाई हाेणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर दिल्ली, गुरगाव, हरियाणा, चेन्नई, पुणे या ठिकाणी १७ बँक खाते खोलण्यात आल्याचे सांगण्यात आले. हे खाते मोहमद इस्माईल मलीक या व्यक्तीसोबत संयुक्तरीत्या काढण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
मलीक या व्यक्तीवर मनी लाँड्रिंग व ड्रग ट्रॅफीकिंचे गुन्हे दाखल असून, तुम्ही निर्दोष होईपर्यंत खाते सील करावे लागेल, असे सांगत फिर्यादीच्या वडिलांकडून २० लाख रुपये उकळण्यात आले. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.