मिरजेत २० लाखांची सुगंधी तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 10:49 PM2017-09-27T22:49:04+5:302017-09-27T22:49:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरजेतील वेताळबानगर येथील बंगल्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व अन्न सुरक्षा विभागाच्या संयुक्त पथकाने २० लाख रुपयांची सुगंधी तंबाखू व सुपारीचा साठा जप्त केला. याप्रकरणी भरतेश सिद्राम कुडचे (वय ३३, रा. नदीवेस, वैरण बाजार, मिरज) याला अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. या विभागाचे पोलिस निरीक्षक राजन माने यांनी खास पथक तयार करून अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्याच्या सूचना केल्या. मिरज शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेताळबानगर येथे भरतेश कुडे याने एका बंगल्यात सुगंधी तंबाखू व सुपारीचा साठा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व अन्न सुरक्षा विभागाने एकत्रित बंगल्यावर छापा टाकला. बंगल्याचा झडती घेतली असता, सुगंधी तंबाखूचे ५०० ग्रॅम वजनाचे २० पॅकबंद डबे, ५० ग्र्रॅम वजनाचे १९२ डबे, २०० ग्रॅमचे २३६ बॉक्स, तंबाखू ३६० चे ५० ग्रॅमचे २४२ डबे, पानमसाल्याचे १०० ग्रॅमचे ९६ पॅकबंद पाऊच, ८,१२३ किलो माव्याची सुपारी असा एकूण २० लाख १२ हजार रुपयांचा माल सापडला. याप्रकरणी भरतेश कुडचे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास अन्न व सुरक्षा विभागाकडे सोपविण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक अंतम खाडे, जीवन राजगुरू, सहाय्यक पोलिस फौजदार राजू कदम, विजय पुजारी, हेडकॉन्स्टेबल मारुती साळुंखे, जितू जाधव, संतोष कुडचे, गजानन घस्ते, सागर पाटील, जगन्नाथ पवार, अमित परीट, सुनील लोखंडे, उदय साळुंखे, शशी जाधव, विकास भोसले, अन्न सुरक्षा विभागाचे आर. आर. शहा यांच्यासह अधिकारी सहभागी झाले होते.
भरतेश कुडचेवर पूर्वीही कारवाई
भरतेश कुडचे हा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व पानमसाला विक्री करतो. यापूर्वीही त्याच्यावर अन्न व सुरक्षा विभागाने कारवाई केली होती. पण त्यानंतरही त्याने हा व्यवसाय सुरूच ठेवला. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकून कुडचे याच्याकडील माल जप्त केला.