राज्यात नवीन २० महामंडळे स्थापन करणार; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
By शीतल पाटील | Published: September 23, 2022 08:13 PM2022-09-23T20:13:46+5:302022-09-23T20:13:59+5:30
सांगलीत घरेलू महिला कामगारांचा मेळावा
सांगली: ग्रामीण भागात बारा बलुतेदारामध्ये वाढ झाली आहे. राज्य शासनाने नुकतेच रिक्षावाल्यांसाठी महामंडळ स्थापन केले आहे. त्याच धर्तीवर घरेलू कामगारांसह वीस महामंडळ नव्याने स्थापन करून डिसेंबरमध्ये निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
भाजप महिला मोर्चाच्यावतीने घरेलू महिला कामगार कल्याण मंडळाचे ओळखपत्र वितरण व पथविक्रेत्या महिलांना परवाना वितरणचा कार्यक्रम येथील पंचमुखी मारूती रस्त्यावरील विजय चौकात पार पडला. यावेळी मंत्री पाटील बोलत होते. कार्यक्रमाला खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा, नगरसेविका स्वाती शिंदे, भाजपचे संघटक मकरंद देशपांडे, नीता केळकर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, राज्यात ५० लाख घरेलू महिला कामगार आहेत. या कामगारांच्या आरोग्याचा खर्च, मुलांच्या शिक्षणासह इतर खर्च असतात. त्यासाठी महामंडळ स्थापन करून त्यांना मदतीचा हात दिला जाईल. डिसेंबरपूर्वी पन्नास कोटींची तरतूद करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महिलांना चांगला स्वयंपाक बनवता यावा, यासाठी दहा दिवस मोफत केटरिंग प्रशिक्षण कोल्हापुरात देण्यात येते. त्या धर्तीवर सांगलीत प्रशिक्षण दिले जाईल. मुलीच्या छेडछाडीचे प्रकार घडतात. पुणे येथे हजारो मुलींना लाठी-काठी प्रशिक्षण दिले आहे. सांगलीत भाजपच्या पदाधिकार्यांनी मुलींना लाठी-काठी प्रशिक्षण द्यावे.