मनोरंजन नगरीला २० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:34 AM2021-02-25T04:34:07+5:302021-02-25T04:34:07+5:30
सांगली : शहरातील वानलेसवाडी येथे सुरू असलेल्या मनोरंजन नगरीत कोरोना नियमांचे उघडपणे उल्लंघन सुरू होते. बुधवारी उपायुक्त स्मृती पाटील, ...
सांगली : शहरातील वानलेसवाडी येथे सुरू असलेल्या मनोरंजन नगरीत कोरोना नियमांचे उघडपणे उल्लंघन सुरू होते. बुधवारी उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्याधिकारी डाॅ. रवींद्र ताटे यांच्या पथकाने मनोरंजन नगरीची तपासणी केली असता, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर होत नसल्याचे आढळून आले. महापालिकेने मनोरंजन नगरीला २० हजार रुपयांचा दंड केला, तसेच मनोरंजन नगरी बंद करण्याचे आदेशही दिले.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. खुद्द आयुक्त कापडणीस हेही रस्त्यावर उतरले आहेत. वानलेसवाडी येथील मनोरंजन नगरीत खाद्यपदार्थांच्या १५ ते २० स्टॉल्सवर गर्दी होत आहे. येथे मोठे पाळणे, टोराटोरा, टॉवर पाळणा, जायंट व्हील या पाळण्यात लहान मुले, स्त्रिया गर्दी करून बसत आहेत. या पाळण्यांचे सॅनिटायझेशन केले जात नाही. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार उपायुक्त स्मृती पाटील, डाॅ. रवींद्र ताटे यांच्या पथकाने मनोरंजन नगरीची पाहणी केली. यावेळी कोरोनाच्या त्रिसूत्रीचे कुठेच पालन होत नसल्याचे आढळून आल्याने संयोजकाला २० हजारांचा दंड करण्यात आला, तसेच मनोरंजन नगरी बंद करण्याची नोटीसही देण्यात आली आहे.
चौकट
दिवसभरात ४३ हजारांचा दंड वसूल
महापालिका क्षेत्रात बुधवारी विनामास्क ७२ व्यक्तींवर कारवाई करत १४ हजार ४०० रुपये दंड वसूल केला आहे; तर सोशल डिस्टन्सिंगबद्दल ८ व्यक्तींना ८ हजार ५०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी ६ व्यक्तींना सहाशे रुपये दंड करण्यात आला, तर मनोरंजन नगरीकडून २० हजार असा ४३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर शहरातील एका माॅलमध्ये दुकानदारांकडून पाचशे रुपये, तर विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडून २०० रुपये दंड वसूल केला.