सांगलीत होणार २०० कोटींचे सहकारी रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:07 AM2018-06-22T00:07:04+5:302018-06-22T00:07:04+5:30
सांगली : प्राथमिक शिक्षकांच्या पुढाकाराने सुमारे २०० कोटी रुपये खर्चाचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले सहकारी रुग्णालय या नावाने जिल्हा उपनिबंधकांनी नोंदणी प्रमाणपत्र नुकतेच रुग्णालयाचे प्रवर्तक शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामुळे रुग्णालय उभारणीतील पहिला टप्पा गाठला असून सर्व अडचणींवर मात करून रुग्णालयाची उभारणी करू, असे मिरजकर यांनी सांगितले.
शिक्षक बँकेच्या एका कार्यक्रमात पाच ते सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सहकारी रुग्णालयाची संकल्पना मांडली होती. शिक्षक बँकेतील सत्ताधारी शिक्षक समितीने रुग्णालयासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही दिली. त्यानुसार भागभांडवल व सभासद नोंदणीला सुरूवात करण्यात आली. सहकारी तत्त्वावरील या रुग्णालयासाठी आतापर्यंत ४० लाखापेक्षा अधिक भागभांडवल जमा झाले आहे, तर ४५२ सभासदांची नोंदणी झाली आहे. सुमारे २०० कोटीचे रुग्णालय उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या सहकारी रुग्णालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले सहकारी रुग्णालय असे नाव देण्यात आले असून, जिल्हा उपनिबंधकांकडे नोंदणीसाठी प्रस्ताव देण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधकांनी संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र दिले आहे.
याबाबत प्रवर्तक मिरजकर म्हणाले की, जिल्ह्यातील संघटित शिक्षकांकडून सामाजिक कार्य व्हावे, या उद्देशाने पालकमंत्री देशमुख यांनी सहकारी रुग्णालयाची संकल्पना मांडली होती. त्याला आता मूर्त स्वरुप येत आहे. जिल्ह्यातील वंचित, गोरगरिबांना सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. तसेच सभासदांसाठीही आरोग्य सेवेत सवलत दिली जाईल. नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पालकमंत्री देशमुख यांची भेट घेतली. त्यांनीही शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष किरण गायकवाड, संचालक रागिणी सतीश पाटील, महेश कनुंजे, सचिव शशिकांत भागवत, समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, बँकेचे अध्यक्ष महादेव माळी, मुसा तांबोळी उपस्थित होते.
जागेसंदर्भात महसूलमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा!
मिरजकर म्हणाले की, रुग्णालयाच्या जागेसंदर्भात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री देशमुख यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार शुक्रवारी जिल्हा प्रशासनाशी आम्ही चर्चा करणार आहोत. राज्य शासन या रुग्णालयाबाबत सकारात्मक असल्याने निश्चित रुग्णालयाची उभारणी पूर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.