पिकल्या पानाचा दर की हो भलता!, खाऊच्या पिवळ्या पानांना सोन्याचा भाव
By श्रीनिवास नागे | Published: March 22, 2023 03:29 PM2023-03-22T15:29:20+5:302023-03-22T15:29:36+5:30
उन्हाळ्यात फक्त कळीच्या पानांनाच मागणी
सांगली : उन्हाळ्याची धग वाढत असताना पानबाजारात मात्र पिवळ्या खाऊच्या पानांना सोन्याचा भाव मिळत आहे. पान व्यवसायातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते.
मिरज तालुक्यात पानमळ्याचे २५० हेक्टर क्षेत्र आहे. या व्यवसायावर लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून आहे. पान उत्पादक शेतकरी, खुडेकरी, वेल बांधणारे वेलके, पान वखारदार, वाहतूकदार, पान टपरीवाले अशा क्षेत्रांचा मागोवा घेतला तर यामध्ये अनेक बेरोजगारांच्या हातांना काम मिळाले आहे. पान व्यवसाय जरी नाशवंत मालाची विक्री करणारा असला तरी दररोज यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, रत्नागिरी, मालवण, फोंडा, चिपळूण, खेड, सांगोला, पंढरपूर आदी प्रमुख पान बाजारपेठेतून पानांची विक्री होते.
सध्या पानबाजारात ३०० पिवळ्या पानांच्या एका कवळीची किंमत २०० ते २५० रुपये आहे. हा दर पिवळ्या मोठवड पानांनाच मिळत आहे. एका केळीने लपेटलेल्या पान डप्प्यात (गठ्ठ्यात) तीन हजार पाने विशिष्ट पद्धतीने लावून बाजारात विक्रीसाठी आणली जातात. पानांमध्ये फाफडा व कळी असे दोन प्रकार पडतात. उन्हाळ्यात फक्त कळीच्या पानांनाच मागणी असते.
फापड्याच्या पानांना जूनपासून पुढे मागणी येते; कारण याचवेळी फापडा खुडण्यास येतो.
पानमळ्यास उन्हाळ्यात पाणी जास्त लागते. मळ्यात नेहमी गारवा असावा लागतो; तरच पाने मोठवड व पिवळी फुटतात. सध्या १० कवळीच्या ३००० पानांच्या एका डप्प्याची किंमत दोन हजार ते अडीच हजार रुपये आहे. हा दर असाच टिकून राहिल्यास पान उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.