प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून मिळालेले 2000 रुपये शेतीसाठी वापरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:10 PM2019-03-02T12:10:05+5:302019-03-02T12:12:01+5:30
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 2 हजार रुपये मिळाले आहेत. ही मदत आम्ही शेतीसाठी वापरणार, अशी प्रतिक्रिया मिरज तालुक्यातील पाटगाव तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सांगली : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 2 हजार रुपये मिळाले आहेत. ही मदत आम्ही शेतीसाठी वापरणार, अशी प्रतिक्रिया मिरज तालुक्यातील पाटगाव तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रति अल्प व अत्यल्प भूधारकशेतकरी कुटुंबाला प्रति वर्ष 6 हजार रूपये इतके आर्थिक सहाय्य 3 टप्प्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातील पहिला टप्पा जमा होण्याच्या कार्यवाहीला दि. 24 फेब्रुवारीपासून सुरवात झाली आहे.
मिरज तालुक्यातील पाटगाव येथील काही शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपये जमा झाल्याचा संदेश भ्रमणध्वनीवर प्राप्त झाला आहे. त्यावर या लाभार्थींनी प्रतिक्रिया देत शासनाचे आभार मानले आहेत.
पाटगावच्या नामदेव नाना चव्हाण यांच्या कुटुंबात पत्नी दोन अविवाहित मुले आणि एक अविवाहित मुलगी आहे. एक मुलगा आणि एका मुलीचा विवाह झाला आहे. त्यांची 54 गुंठे शेती आहे. शेतात शाळू, गहू ते लावतात. मात्र, शेती करताना निसर्गाच्या अनियमिततेचा फटका त्यांना अनेक वेळा बसला. त्यामुळे एवढे मोठे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी ते शेतीसोबत मिरज एमआयडीसीत कामालाही जातात. त्यामुळे वर्षाला 6 हजार रुपये मिळणारी रक्कम त्यांना मदतपूर्ण ठरणार आहे.
यातील पहिल्या हप्त्यातील 2 हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. ही रक्कम शेतीसाठी बी-बियाणे याच्यासाठी पूरक ठरणार आहे. याबद्दल त्यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
गजानन ज्ञानदेव सावंत यांचे वडील, पत्नी आणि मुलगा असे चौकोनी कुटुंब. त्यांना परंपरागत अर्धा एकर शेती मिळाली आहे. त्यात ते केळीची लागवड करतात. बारावी शिक्षण असूनही परंपरागत शेती ते करतात. त्याच्या जोडीला कपडे शिलाईचे कामही करतात.
सांगली येथे 24 फेब्रुवारीला प्रधानमंत्री किसान योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमातच त्यांना त्यांची निवड झाल्याचा संदेश प्राप्त झाला. तर त्यांच्या बँकेत 2 हजार रुपये प्राप्त झाल्याचाही संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर आला आहे. यातून शेतीसाठी त्यांच्या खिशातील काही रक्कम वाचणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पाटगावमधीलच शिवाजी शंकर सावंत यांच्या घरी पत्नी, एक विवाहित व एक अविवाहित अशी 2 मुले, सून, 2 नातवंडे आहेत. त्यांची 27 गुंठे शेती असून, ते पूर्णवेळ शेती करतात. शेतात शाळू, सोयाबीन लागवड करतात. त्यांचे विवाहित चिरंजीव प्रकाश पंपावर कामाला जातो. तर एक मुलगा शिक्षण घेत आहे. त्यांच्या भ्रमणध्वनीवर 2 हजार रुपये जमा झाल्याचा संदेश प्राप्त झाल्याची माहिती प्रकाश सावंत यांनी दिली.
पाटगावचे 83 वर्षीय सदाशिव निवृत्ती पाटील यांनीही इतर शेतकऱ्यांप्रमाणे आपल्या खात्यावर पैसे जमा होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. शासनाने योग्य वेळी मदत केली असून, आपल्या शेतीसाठी ती पूरक ठरणार असल्याची प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी दिली आहे.