शासनाने मानधन देण्यासाठी दिंड्यांची माहिती मागवली; नोंदणीपत्र, व्यसनमुक्तीच्या उपक्रमांची विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 03:56 PM2024-06-26T15:56:50+5:302024-06-26T15:57:16+5:30
सांगली जिल्ह्यातील तब्बल ८०० वारकरी दिंड्यांना २० हजार रुपयांचे मानधन मिळणार
सांगली : पंढरपूरला जाणाऱ्या दिड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे मानधन देण्याची घोषणा शासनाने केली आहे. त्या अनुषंगाने राज्यभरातील दिंड्यांची माहिती दिंडी संयोजकांकडून मागविली आहे.
सांगली जिल्ह्यातील तब्बल ८०० वारकरी दिंड्यांना २० हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. त्यानुसार दिंड्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. शासनाने राज्यभरातील दिंड्यांसाठी १८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अनुदानासाठी गेल्या सहा वर्षांपासून वारकरी साहित्य परिषदेकडून पाठपुरावा सुरू होता. प्रत्येक दिंडीला ५० हजार रुपयांची मागणी केली होती, त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता माहिती मागविण्यात आली आहे.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अवर सचिव प्रशांत वाघ यांनी साहित्य परिषदेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आषाढी वारीमध्ये किती दिंड्यांचा समावेश असतो याची माहिती द्यावी. प्रत्येक दिंडीचे नोंदणीपत्र, दिंड्यांच्या प्रभारींचे आधार कार्ड, दिंड्यांच्या नावाचे बँक खाते, आदी तपशील तातडीने द्यावा.
वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांगितले की, अधिकाधिक दिंड्यांना मानधनाचा लाभ व्हावा असा प्रयत्न आहे. आषाढी वारीतील प्रत्येक दिंडीला मानधन देण्यासाठी शासनाने प्रस्ताव मागविले आहेत. दरम्यान, शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी या निर्णयाबद्दल शासनाचे आणि वारकरी साहित्य परिषदेचे अभिनंदन केले. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मानधनाची योजना अमलात आल्याचे पक्षाच्या बैठकीत सांगितले.
मानधनासाठी व्यसनमुक्तीचा निकष
दरम्यान, दिंड्यांना मानधन देण्यात येणार असले, तरी त्यासाठी व्यसनमुक्तीचा निकष लावला जाणार आहे. व्यसनमुक्तीसाठी प्रबोधनाचा उपक्रम सामाजिक न्याय विभाग राबवते. त्यामुळे दिंड्यांकडून वारीच्या सोहळ्यात व्यसनमुक्तीसाठी कोणते उपक्रम राबविले जाणार आहेत याचीही माहिती द्यावी, अशी सूचना शासनाने केली आहे.