सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडे २०३ कोटींची एफआरपी थकीत, शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी नाहीच
By अशोक डोंबाळे | Published: February 25, 2023 05:51 PM2023-02-25T17:51:59+5:302023-02-25T17:52:24+5:30
एफआरपीच्या निर्णयाला केराची टोपली
अशोक डोंबाळे
सांगली : जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांपैकी चक्क नऊ कारखान्यांनी शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी दिली आहे. पण, चार कारखान्यांकडे चक्क २०३ कोटी ५३ लाख ७१ हजार रुपयांची एफआरपी थकीत आहे. या कारखान्यांनी एफआरपीचे टप्पे केल्याचे दिसत असून एकरकमी एफआरपीच्या निर्णयाला केराची टोपली दाखविल्याचे दिसत आहे.
चालू गळीत हंगामातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. या साखर कारखान्यांचा अहवाल साखर आयुक्तालयाने १५ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसिद्ध केला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांपैकी चक्क नऊ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.
वाळव्यातील हुतात्मा, कुंडल येथील क्रांती, सांगली येथील (वसंतदादा कारखाना) दत्त इंडिया आणि राजेवाडी येथील श्री श्री शुगर या कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे २०३ कोटी ५३ लाख रुपयांची एफआरपी थकीत आहे. या कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
शंभर टक्के एफआरपी दिलेले कारखाने
जिल्ह्यातील राजारामबापू युनिट साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी, तिप्पेहळ्ळी, पतंगराव कदम, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया शुगर आणि उदगिरी शुगर या कारखान्यांनी एकरकमी १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. यामुळे या कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.
जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. पण, क्रांती, हुतात्मा, दत्त इंडिया, श्री श्री शुगर या कारखान्यांनी एफआरपी थकीत ठेवली आहे, हे योग्य नाही. या कारखान्यांनी तातडीने थकीत सर्व एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली पाहिजे. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल. - संदीप राजोबा, कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
थकीत एफआरपी असलेले कारखाने
कारखाना - थकीत रक्कम
- हुतात्मा - ३३.३३ कोटी
- दत्त इंडिया - ७२.२८ कोटी
- क्रांती - ५५.४१ कोटी
- श्री श्री शुगर - ४२.३६ कोटी
- एकूण - २०३.३८ कोटी