Sangli: कुपवाड ड्रेनेजची २०६ कोटीची निविदा मंजूर, प्रकल्पाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम
By शीतल पाटील | Published: July 24, 2023 06:10 PM2023-07-24T18:10:48+5:302023-07-24T18:11:29+5:30
सांगली : कुपवाड ड्रेनेज योजनेच्या २०६ कोटी रुपयांच्या निविदेला सोमवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे गेल्या आठ ते ...
सांगली : कुपवाड ड्रेनेज योजनेच्या २०६ कोटी रुपयांच्या निविदेला सोमवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे गेल्या आठ ते दहा वर्षापासून कुपवाड ड्रेनेजच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ड्रेनेज योजनेचा प्रारंभ केला जाईल, असे सभापती धीरज सूर्यवंशी यांनी सांगितले.
सभापती सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. सभेत कुपवाड ड्रेनेज योजनेच्या निविदा मान्यता विषय होता. हा विषय एकमताने मंजूर करण्यात आले. याबाबत सूर्यवंशी म्हणाले की, कुपवाडची पाणी योजना मार्गी लागल्यानंतर ड्रेनेज योजनेसाठी पाठपुरावा सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार व आपण शासनाकडे पाठपुरावा केला. नगरविकास विभागाने कुपवाड योजनेला मान्यता दिली. प्रशासनाने २०६ कोटी रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध केली.
या योजनेवर केंद्र सरकारकडून ८४.४६ कोटी, राज्य सरकारकडून ९२.९३ कोटी व महापालिका हिस्सा ७६.०२ कोटी व वाढीव रक्कम ३०.७४ कोटी इतका होणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये १५ व्या वित्त आयोगामधून महापालिका हिस्सा म्हणून १५ कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. महापालिकेला ९१ कोटींचा वाढीव निधी उभारावा लागणार आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर वाढीव निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार आहोत. लवकरच मुखमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या योजनेच्या कामाला सुरूवात होईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.