Sangli News: मिरजेत मृताच्या खात्यातील २१ लाखांवर बँक व्यवस्थापकाचाच डल्ला, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 05:30 PM2022-12-31T17:30:31+5:302022-12-31T17:31:51+5:30
खातेदार राव यांच्या बहिणीच्या मुलाने मामाच्या खात्याची चाैकशी करून या खात्यातील रक्कम वर्ग झाल्याबाबत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला.
मिरज : मिरजेत स्टेट बँकेच्या शाखेतील मृत खातेदाराच्या खात्यातील २१ लाख २८ हजार ३६४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक अनिल साळे व त्याचा साथीदार अवधूत पाटील या दोघांना फसवणूक प्रकरणी गांधी चौक पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघांना पाच दिवस पोलिस कोठडी दिली.
मिरजेतील स्टेट बँकेच्या वाॅन्लेस हाॅस्पिटल शाखेत रघुवीरकुमार रतन राव खातेदार होते. बिहारमधील रघुवीर राव आखाती देशात नोकरीस होते. राव मिरजेला उपचारासाठी येत असल्याने त्यांनी मिरजेत स्टेट बँक शाखेत तीन खाती काढून त्यात २१ लाख रक्कम ठेवली होती. ११ मार्च २०१८ रोजी राव दिल्ली येथे मृत झाले. त्यामुळे त्यांच्या एकूण तीन खात्यांतील व्यवहार दोन वर्षे बंद होते. या खात्यात २१ लाख २८ हजार ३६४ रुपयांची रक्कम शिल्लक होती.
खातेदार राव यांना वारस नसल्याचे व ते मृत असल्याचे लक्षात आल्यानंतर तात्कालीन व्यवस्थापक अनिल साळे याने ही रक्कम हडप करण्याचा डाव रचला. साळे याने राव यांची बोगस सही करून त्याचा मित्र अवधूत पाटील याच्या खात्यावर रक्कम वर्ग केली. दोघांनी मृत खातेदाराच्या खात्यातील २१ लाखांच्या रकमेवर डल्ला मारून ही रक्कम वाटून घेतली.
मात्र, खातेदार राव यांच्या बहिणीच्या मुलाने मामाच्या खात्याची चाैकशी करून या खात्यातील रक्कम वर्ग झाल्याबाबत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत व्यवस्थापनातर्फे विद्यमान व्यवस्थापक मयूर चंद्रशेखर यळमळ्ळी यांनी याबाबत पोलिसांत फसवणुकीची फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल होताच साळे व अवधूत पाटील यांना अटक केली असून सरकारी बँकेतच असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली होती.
दरम्यान, शासकीय बँकेतील अधिकाऱ्यांकडून असा प्रकार झाल्यामुळे बँक ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. बँक कर्मचारीही चिंतेत आहेत.