21 वर्षीय माथेफिरू युवकाचा तरुणीवर तलवारीनं वार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 06:47 PM2018-01-28T18:47:20+5:302018-01-28T18:54:39+5:30
ताकारी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे शनिवारी रात्री एकतर्फी प्रेमातून एका 21 वर्षीय माथेफिरू युवकाने संबंधित मुलीच्या घरात घुसून तलवारीने हल्ला चढवला.
इस्लामपूर : ताकारी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे शनिवारी रात्री एकतर्फी प्रेमातून एका 21 वर्षीय माथेफिरू युवकाने संबंधित मुलीच्या घरात घुसून तलवारीने हल्ला चढवला. यामध्ये या 21 वर्षीय युवतीच्या डोक्यात तलवारीचा वार वर्मी बसल्याने ती गंभीर जखमी झाली, तर तिचा भाऊही या हल्ल्यात जखमी झाला. शनिवारी रात्री 8च्या सुमारास हा हल्ला झाल्यानंतर ताकारीत खळबळ उडाली होती. हल्ल्यानंतर तलवार आणि चाकू टाकून हल्लेखोराने पलायन केले.
ऐश्वर्या प्रकाश पवार (21) आणि अश्विन प्रकाश पवार (19) अशी जखमी बहीण भावाची नावे आहेत. ऐश्वर्यावर क-हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असून, ती अद्याप बेशुद्धावस्थेत आहे. अश्विन याला उपचारानंतर घरी सोडले आहे. ऐश्वर्या ही इस्लामपूर येथील महाविद्यालयात शास्त्र शाखेच्या पदवीच्या तिस-या वर्षात शिकत आहे. याबाबतची माहिती अशी, हल्लेखोर शुभम राजेंद्र पवार (21) हा गेल्या दोन वर्षांपासून ऐश्वर्याला त्रास देत आहे. यापूर्वी त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाल्याचे समजते. मात्र तरीही त्याने ऐश्वर्याला त्रास देणे थांबवले नव्हते.
ऐश्वर्या ही आपली आजी, आजोबा, आई व दोन लहान भावांसमवेत कालव्याच्या वरच्या परिसरात राहते. तिचे वडील प्रकाश पवार हे कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास असतात. हल्लेखोर पवार हा दत्त मंदिरानजीक राहतो. शनिवारी रात्री ऐश्वर्या आपल्या घरात कुटुंबीयांसह बोलत बसली होती. घराचा दरवाजा पुढे ढकलण्यात आला होता. त्यावेळी हल्लेखोर पवार हा तलवार हातात घेऊन थेट त्यांच्या घरात घुसला व तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत त्याने अश्विनच्या डोक्यात आणि कमरेवर वार केले. यादरम्यान ऐश्वर्या व आजीमध्ये पडल्यावर, आजीला ढकलून शुभम पवार याने थेट ऐश्वर्याच्या डोक्यात तलवारीचा वार केला. यामध्ये ती रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली.
हल्ल्यानंतर आरडाओरडा झाल्याने शेजारी धावत आले. त्यांना पाहून शुभम पवार याने तलवार आणि चाकू तेथेच टाकून पलायन केले. त्यानंतर दोघांना उपचारासाठी क-हाडला हलविण्यात आले. अश्विन पवार याने फिर्याद दिली आहे. हल्लेखोर शुभम पवार याच्याविरुद्ध, घरात घुसून खुनाचा प्रयत्न करणे, प्राणघातक हत्यारे बेकायदेशीरपणे बाळगणे अशा कलमांखाली गुन्हा नोंद झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे अधिक तपास करत आहेत.