कारखान्यांना साखर निर्यातीतून २१४ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 10:29 PM2020-05-15T22:29:41+5:302020-05-15T22:32:43+5:30
अशोक डोंबाळे । सांगली : जिल्ह्यातील कारखान्यांनी वीस लाख क्विंटल साखरेची निर्यात केल्यामुळे कारखान्यांना अडचणीच्या कालावधित २१४ कोटी उपलब्ध ...
अशोक डोंबाळे ।
सांगली : जिल्ह्यातील कारखान्यांनी वीस लाख क्विंटल साखरेची निर्यात केल्यामुळे कारखान्यांना अडचणीच्या कालावधित २१४ कोटी उपलब्ध झाले आहेत. राजारामबापू कारखान्याने आघाडी घेतली असून, सात लाख क्विंटल साखरेची विक्री केली आहे. लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या कारखान्यांसाठी हा चांगला पर्याय असल्याचे साखर उद्योगाशी संबंधितांचे मत आहे. दि. ३० जूनपर्यंतच निर्यातीसाठी कारखान्यांना मुदत आहे.
जिल्ह्यातील कारखान्यांनी ६६ लाख ९८ हजार ४०० टन उसाचे गाळप करून ८२ लाख ८७ हजार ५११ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. गतवर्षीच्या तुलनेत १७ लाख क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले आहे. उत्पादन घटल्यामुळे दर चांगला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण लॉकडाऊनमुळे मिठाई, शीतपेये, आईस्क्रिम, गोळ्या तयार करणाऱ्या कंपन्या बंद असल्यामुळे ७५ टक्के साखरेला मागणीच नाही.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, २५ टक्केच साखर घरगुती वापरासाठी लागते. यामुळे रेशनिंगवर साखर विक्री करायची म्हटले तरीही कारखान्यांसमोरील आर्थिक संकट संपणारे नाही. शिल्लक साखरेची निर्यात करूनच प्रश्न सोडवावा लागणार आहे.
भारतात साखरेचा दर प्रतिक्विंटल ३१०० ते ३१७० रुपये आहे. निर्यात केल्यास परदेशात २२०० ते २४०० रुपये दर मिळत आहे. केंद्र शासनाकडून निर्यातीसाठी १०४४.८० रुपये अनुदान आहे. त्यामुळे ३२४४.८० रुपये ते ३४४४.८० रुपयेपर्यंत दर मिळत आहे. शिल्लक साखर गोदामात ठेवल्यास बँकेच्या व्याजाचा बोजा वाढणारच आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून कारखानदारांनी निर्यात करून शिलकीचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी वीस लाखांपर्यंतची साखर निर्यात करून २१४ कोटी रुपये पदरात पाडून घेतले आहेत.
‘राजारामबापू’च्या तीनही युनिटने सात लाख सात हजार ८३० क्विंटल साखरेची विक्री केली आहे. अतिरिक्त कोट्यातील साखरही त्यांनी विक्री केली. दालमिया, दत्त इंडिया, विश्वास कारखान्यांनीही अतिरिक्त साखर निर्यात केली आहे.
उर्वरित कारखाने साखर निर्यातीत मागे राहिल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या कारखान्यांना दि. ३० जूनपर्यंत साखर विक्रीची मुदत आहे.
जिल्ह्यातील साखर निर्यात (क्विंटल)
कारखाना साखर
राजारामबापू ३५४०४०
राजारामबापू-वाटेगाव २०३३२०
राजारामबापू-कारंदवाडी १५४०७०
हुतात्मा १७२९९०
सोनहिरा २०६०१०
क्रांती २०७२५०
उदगिरी १०४६९०
सद्गुरू श्री श्री ९५५५०
दालमिया-निनाईदेवी ६३५८०
दत्त इंडिया-वसंतदादा १५७१००
विश्वास १४७२००
मोहनराव शिंदे ४०५००
केन अॅग्रो ६५४९०
महांकाली ३१३१०
माणगंगा २९७९०
यशवंत-नागेवाडी १३४७०
एकूण २०४६३६०
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जास्तीत जास्त साखर निर्यात करून अडचणीतून बाहेर पडण्याची गरज आहे. साखर शिल्लक ठेवल्यास त्या रकमेवर बँकांचा कर्जाचा बोजा वाढणारच आहे. त्यापेक्षा साखर निर्यात केल्यास त्याचा कारखान्यांना फायदाच होणार आहे. तसेच केंद्र शासनाने साखर खरेदी करून रेशनिंगवर वाटप करण्याची गरज आहे. यामुळे शिल्लक साखरेचा साठा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
- आर. डी. माहुली, व्यवस्थापकीय संचालक, राजारामबापू पाटील कारखाना, साखराळे