Sangli: रेणावीत रविवारी २१ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
By हणमंत पाटील | Published: December 8, 2023 11:42 AM2023-12-08T11:42:44+5:302023-12-08T11:43:05+5:30
अरविंद पुजारी, मनीषा पाटील, मंदाकिनी सपकाळ यांना पुरस्कार जाहीर
खानापूर : रेणावी येथील श्रीमती शहाबाई यादव सांस्कृतिक, साहित्य, कला विकास मंचच्या वतीने २१ वे ग्रामीण साहित्य संमेलन १० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात ‘श्रीमती शहाबाई यादव साहित्य गौरव पुरस्कारा’ने ज्येष्ठ लेखक अरविंद पुजारी, मनीषा पाटील आणि मंदाकिनी सपकाळ यांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती मंचचे सचिव धर्मेंद्र पवार व निवड समितीचे अध्यक्ष प्रा. संजय ठिगळे यांनी दिली.
यंदाच्या पुरस्काराचे मानकरी असलेले अरविंद पुजारी यांची साहित्यकृती, साहित्यविचार आणि साहित्य समीक्षा याचे महाथोर वाचक अशी ओळख आहे. दुसऱ्या मानकरी देशिंग- हरोली येथील श्री महालक्ष्मी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या अध्यापिका कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर आहेत. ‘पायवाटेवरील दिवे’, ‘माती विश्व’, ‘नाती वांझ होताना’ हे कवितासंग्रह तसेच विचार मंथन हा भाषणसंग्रह प्रकाशित झालेला आहे. अभिव्यक्ती साहित्य प्रतिष्ठानच्या त्या संस्थापक अध्यक्षा आहेत. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
देवराष्ट्रे येथील मंदाकिनी दत्तात्रय सपकाळ या महाराष्ट्ररत्न वि. स. पागे कृषी माध्यमिक विद्यानिकेतन, तासगाव येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. ''लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : जीवन व कार्य'' हे चरित्र पुस्तक त्यांनी लिहिले आहे. मराठी व हिंदी विषयात त्यांनी कविता लिहिल्या आहेत. निबंध स्पर्धेत "अण्णा भाऊ साठे" या विषयात प्रथम क्रमांक मिळविला. निर्मिती विचारमंच राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. सुजन फाउंडेशन आयोजित अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावला आहे.
रविवार १० डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता रेणावी येथे होणाऱ्या २१ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे धर्मेंद्र पवार यांनी सांगितले.