पलूस-कडेगावसाठी २२ कोटी निधी
By admin | Published: April 5, 2016 11:43 PM2016-04-05T23:43:04+5:302016-04-06T00:04:05+5:30
पतंगराव कदम : चंद्रकांत पाटील, गडकरी यांच्याशी विकासकामांबाबत चर्चा
कडेगाव : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांसाठी केंद्रीय राखीव निधीतून साडेबावीस कोटींची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. याबाबत केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी माहिती आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी दिली.
याबाबत माहिती देताना डॉ. कदम म्हणाले की, याशिवाय जिल्ह्यातील रेल्वे क्रॉसिंगवर असलेल्या रस्त्यांवर उड्डाण पुलांचीही कामे प्रस्तावित आहेत. ही सर्व कामे लवकरच मार्गी लागतील. पुसेसावळी-कडेपूर वांगी-अंबक-कुंभारगाव-कुंडल राज्यमार्ग १५८ च्या सुधारणा व रुंदीकरण करण्यासाठी १६ कोटी ५० लाख इतका निधी, तर वांगी - रामापूर-बांबवडे प्रजिमा १९ च्या सुधारणा करण्यासाठी ६ कोटींचा निधी गडकरी व चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्याचे डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले.
याशिवाय सांगली जिल्ह्यातील ज्या रस्त्यांवर रेल्वेक्रॉसिंग आहेत त्याठिकाणी उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत मंत्री नितीन गडकरी यांच्याशी समक्ष चर्चा झाली असून, भिलवडी स्टेशन, रामानंदनगर (किर्लोस्करवाडी), विठ्ठलवाडी (आमणापूर) वसगडे, घोगाव, भवानीनगर आणि माधवनगर (जुना बायपास रस्ता) याठिकाणी उड्डाणपुलांची मागणी केलेली आहे. त्यासाठी निधी मंजूर होणार आहे.
याशिवाय पलूस तालुक्यातील दह्यारी येथे यापूर्वीच उड्डाण पूल मंजूर करून घेतला आहे. त्याचेही काम लवकरच सुरू होईल, असे यावेळी कदम यांनी सांगितले. ताकारी-टेंभू योजनेची वीजबिले शासनाने टंचाईतून भरावी, याबाबतही संबंधित मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. (वार्ताहर)
मंत्र्यांशी सलोखा आणि विकासकामांना गती
मी विकासकामात कधीही राजकारण आणत नाही. राज्यातील आणि केंद्रातील मंत्र्यांशी माझे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्याकडे मुंबईत सातत्याने प्रस्तावित विकासकामांच्या निधीसाठी माझा पाठपुरावा असतो. जिथे काम असेल त्या मंत्र्यांच्या थेट दालनात जाऊन कामांची मंजुरी घेतो. यामुळे सत्ता असो किंवा नसो पलूस-कडेगाव मतदारसंघातील विकासकामांचा वेग मात्र कायम आहे, असे कदम यांनी सांगितले.