शिराळ्यात २२ तलाव कोरडे
By Admin | Published: March 3, 2017 11:47 PM2017-03-03T23:47:02+5:302017-03-03T23:47:02+5:30
एकाच तलावात ५0 टक्केपेक्षा जास्त पाणी : उत्तर भागात तीव्र टंचाईचे संकट; आंदोलनाचा इशारा
विकास शहा ल्ल शिराळा
शिराळा तालुक्यातील ४९ पैकी २२ पाझर तलाव मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरडे पडले आहेत, तर फक्त एकाच तलावात ५0 टक्केपेक्षा जास्त पाणी आहे. त्यामुळे यावर्षी पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचीही भीषण टंचाई जाणवण्याची दाट शक्यता आहे. तालुक्याच्या उत्तर भागात अनेक गावांना आतापासूनच पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे.
शिराळा तालुक्याला पावसाचे आगर म्हणून संबोधले जाते. मात्र तालुक्यातील उत्तर भागात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यात ४९ पाझर तलाव आहेत. त्यापैकी सावंतवाडी, शिरसटवाडी, हात्तेगाव (आंबाबाईवाडी), कोंडाईवाडी नंबर १, शिरशी नंबर १, शिरशी (भैरवदरा), शिरशी (काळेखिंड), शिरवाडी, भैरेवाडी, पणुंब्रे तर्फ शिराळा नंबर १, औंढी, निगडी जुना, निगडी (खोकडदरा), करमाळे नंबर २, भटवाडी, बेलदारवाडी, इंगु्रळ, लादेवाडी, भाटशिरगाव, तडवळे नंबर १, पावलेवाडी नं. १ हे तलाव कोरडे पडले आहेत. कोंडाईवाडी नंबर २ (१0 टक्के पाणी), कापरी (१0 टक्के), चरणवाडी नंबर १, चव्हाणवाडी, मेणी, प. त. शिराळा नं. २, वाकुर्डे बुद्रुक, पाडळी, पाडळीवाडी, बिऊर, तडवळे (वाडदरा) यामध्ये २0 टक्के, गवळेवाडी (बहिरखोटा), बादेवाडी (वाकुर्डे बुद्रुक), रेड क्र. २ (२५ टक्के), गवळेवाडी (उंदीरखोरा), धामवडे, शिरशी, (कासारकी), वाकुर्डे खुर्द, निगडी (महारदरा), पाचुंब्री या तलावांमध्ये ३0 टक्के, अंत्री खुर्द, करमाळा नं. १ यामध्ये ३५ टक्के, आटुगडे (मेणी), हात्तेगाव (अशील कुंड), खिरवडे याठिकाणी ४0 टक्के, तर वाडीभागाई येथे ५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
शिंदेवाडी तलाव नोव्हेंबर महिन्यातच कोरडा पडला आहे. तालुक्याच्या उत्तर भागातील मुख्य वाकुर्डे बुद्रुक, शिंदेवाडी, धामवडे, खेड, बेलदारवाडी यांसह वाड्या-वस्त्यांवर आतापासूनच ५ ते १0 दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. पंचायत समिती, पाटबंधारे विभागाकडून २0 गावे व १७ वाड्यांसाठी दोन तात्पुरत्या नळपाणी योजनांतून, २0 विहिरी अधिग्रहण करणे, १२ गावे व १६ वाड्यांसाठी टँकरने पाणी पुरवठा करण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.