२२ वर्षीय पैलवानाचा ग्रामपंचायत निवडणुकीवेळी निर्घृण खून; दोन जण आले, दुचाकीवर बसवून नेले, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 02:26 PM2022-12-14T14:26:29+5:302022-12-14T14:29:48+5:30
राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचारात आकाश सक्रिय होता
मिरज : सोनी (ता. मिरज) येथे मंगळवारी मध्यरात्री आकाश माणिक नरुटे (वय २२) या पैलवानाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करून खून करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी उत्तम अशोक नरुटे (२१), दत्ताजी संभाजी कदम (२१), सम्मेद शांतिनाथ चौगुले (१८, रा. सर्व सोनी) या तिघांना अटक केली आहे.
पैलवान असलेला आकाश भावासोबत शेती करीत होता. त्याचे काही दिवसांपूर्वी गावातील काहीजणांसोबत भांडण झाले होते. त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. सोनी येथे सध्या ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे. राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचारात सक्रिय असलेल्या आकाश यास सोमवारी (दि. १२) रात्री त्याच्याच भावकीतील उत्तम नरुटे याने बोलावून दुचाकीवर बसवून नेले.
त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आकाश याचा मोबाइल बंद असल्याने नातेवाइकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. रात्री बारा वाजता गावाजवळ करोली रस्त्यावर न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर एका कोपऱ्यात आकाशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. हल्लेखोरांनी आकाशच्या डोक्यात पाठीमागील बाजूस धारदार कोयत्याने अनेक वार केल्याने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता.
संशयितांकडून खुनाची कबुली
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून आकाशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी आकाश यास दुचाकीवर बसवून नेणाऱ्या उत्तम नरुटे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सम्मेद चौगुले व दत्तात्रय कदम यांच्या मदतीने आकाशचा खून केल्याची कबुली दिली.
आकाश याच्या निर्घृण खुनामागे पूर्ववैमनस्य की अन्य कोणते कारण आहे, याचा तपास सुरू असल्याचे ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खुनासाठी वापरलेला कोयता अद्याप सापडलेला नाही.
सोनीत ग्रामपंचायत निवडणूक सुरू असून राष्ट्रवादीसमर्थक आकाश नरुटे या पैलवान तरुणाच्या खुनामुळे पोलिसांची धावपळ उडाली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.