आॅक्टोबर महिन्यात २२६ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:53 PM2017-10-22T23:53:23+5:302017-10-22T23:53:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात जून ते सप्टेंबरअखेर ४४९.७ मिलिमीटर, तर दि. १ ते १६ आॅक्टोबर या कालावधित ११२.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, आॅक्टोबरच्या पावसाची टक्केवारी २२६ आहे. आॅक्टोबर महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची मागील दहा वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातही समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यंदा शेतकºयांची खºयाअर्थाने दिवाळी आनंदाची होत आहे.
मान्सूनपूर्व पाऊस आणि मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस फारसा समाधानकारक नसल्यामुळे शेतकºयांसह जिल्हा प्रशासनही चिंतेत होते. जुलै, आॅगस्ट महिन्यात दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु होते. चाºयाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकºयांनी पशुधनासह वाळवा, पलूस तालुक्याकडे स्थलांतर केले होते. दि. १५ आॅगस्टनंतर मात्र जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरअखेरपर्यंत चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकºयांची चिंता काही प्रमाणात मिटली होती. साधारणत: शासकीय दफ्तरी तर सप्टेंबरला पाऊस थांबतोच, असे चित्र आहे. पण यावर्षी शासकीय दफ्तरी पाऊस थांबला असला तरी, आॅक्टोबर महिन्यात झालेल्या विक्रमी पावसाने शेतकरी समाधानी आहे. आॅक्टोबर महिन्यात सरासरी ४९.७ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता असताना, यावर्षी दि. १ ते १६ आॅक्टोबर या पंधरा दिवसांच्या कालावधित ११२.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाची टक्केवारी २२६ आहे. मिरज तालुक्यात सर्वाधिक २९६.७ टक्के, तर जत तालुक्यात २७३.५ टक्के पाऊस झाला आहे. आटपाडी, पलूस आणि शिराळा तालुक्यातच १०० ते १८३ टक्के पाऊस झाला असून उर्वरित तालुक्यात २०० टक्केहून जास्त पावसाची पाटबंधारे विभागाकडे नोंद झाली आहे.
दुष्काळग्रस्तांना दिलासा : नदीकाठी नाराजी
नेहमी आॅक्टोबर महिन्यात उष्णता असते. पण यावेळी याच महिन्यात सलग पंधरा दिवस पाऊस सुरु असल्यामुळे वातावरणात गारवा आहे. दुष्काळी तालुक्यातील तलावही तुडुंब भरले असून, सर्व परिसर हिरवागार झाला आहे. नदीकाठच्या भागातील सोयाबीन, भात, भुईमूग शेंगा काढणीचा हंगाम सुरू आहे. याच कालावधित सलग पंधरा दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत.