अवसायनातील बॅँकांकडून २२७ कोटींच्या ठेवींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 11:42 PM2019-06-08T23:42:44+5:302019-06-08T23:44:13+5:30
आर्थिक गैरव्यवहारांसह इतर अनेक कारणांनी अवसायनात गेलेल्या जिल्ह्यातील सहा बॅँकांच्या अवसायकांनी ठेवीदारांना थोडाफार का होईना दिलासा दिला आहे. सहा बॅँकांकडून आत्तापर्यंत २२७ कोटी ७१ लाख ठेवींचे ठेवीदारांना वाटप केले असून,
शरद जाधव ।
सांगली : आर्थिक गैरव्यवहारांसह इतर अनेक कारणांनी अवसायनात गेलेल्या जिल्ह्यातील सहा बॅँकांच्या अवसायकांनी ठेवीदारांना थोडाफार का होईना दिलासा दिला आहे. सहा बॅँकांकडून आत्तापर्यंत २२७ कोटी ७१ लाख ठेवींचे ठेवीदारांना वाटप केले असून, यासाठी विमा महामंडळाने मंजूर केलेल्या ‘क्लेम’चा फायदा ठेवीदारांना झाला आहे. आता थकित कर्जाची वसुली व बॅँकांच्या स्थावर मालमत्तांची विक्री करून महामंडळाचे पैसे अदा केले जाणार आहेत.
सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जिल्ह्यातील काही बॅँकांतील गैरव्यवहारामुळे बॅँका अवसायनात गेल्या. अवसायकांनी ताबा घेत ठेवीदारांच्या पैशाच्या तरतुदीस सुरुवात केली होती. जिल्ह्यातील सात नागरी व सहकारी बॅँकांचा यात समावेश आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँक, कुपवाड अर्बन, मिरज अर्बन बॅँक, यशवंत बॅँक, कृष्णा व्हॅली बॅँक आणि धनश्री महिला बॅँक, मिरजचा यात समावेश आहे. सातपैकी लॉर्ड बालाजी बॅँकेची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
या सर्व बॅँकात वसंतदादा बॅँकेच्याच ठेवी सर्वाधिक आहेत. वसंतदादा बॅँकेच्या १ लाखाच्या आतील ठेवी १७८ कोटी ३८ लाख १२ हजार आहेत. यातील १५३ कोटी ८१ लाख ७२ हजारांच्या ठेवी ठेवीदारांना परत करण्यात आल्या आहेत. या बॅँकेच्या १ लाखावरील ठेवी १५६ कोटी ३४ लाख ६६ हजार होत्या. त्यातील २ कोटी ९८ लाख ४४ हजार रुपये ठेवीदारांना मिळाले आहेत.
उर्वरित बॅँकांमध्ये कुपवाड अर्बन बॅँकेने ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या आहेत; तर यशवंत बॅँकेनेही १ लाखाच्या आतील ठेवी परत केल्या आहेत. कुपवाड अर्बन बॅँकेच्या १ लाखाच्या आतील १२ कोटी २९ लाखांच्या ठेवी होत्या, त्यातील ११ कोटी ३ लाखांचे वाटप ठेवीदारांना करण्यात आले आहे. या बॅँकेने दोन्ही प्रकारातील ठेवी परत केल्या आहेत.
मिरज अर्बन बॅँकेच्या १ लाखाच्या आतील ४२ कोटी २९ लाख ठेवी असून, त्यातील ४० कोटी ५९ लाखांच्या ठेवी ठेवीदारांना परत करण्यात आल्या आहेत. एक लाखांवरील ठेवी मात्र परत देण्यात आल्या नसून, वसुलीनंतर या ठेवी देण्यात येणार आहेत. मिरज येथील यशवंत बॅँकेकडे १ लाखाच्या आतील ११ कोटी ४६ लाख ३८ हजारांच्या ठेवी होत्या, त्यातील १० कोटी ५८ लाख परत देण्यात आल्या आहेत.
विमा महामंडळाचा क्लेम
रिझर्व्ह बॅँकेच्या अखत्यारित असलेल्या ‘डिपॉझिट इन्शुरन्स अॅण्ड के्रडिट गॅरंटी कार्पोरेशन’च्या माध्यमातून अवसायनातील बॅँकांना विम्याचा ‘क्लेम’ मंजूर झाला आहे. यातून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यात येत आहेत. विमा महामंडळाला ही रक्कम परत करावयाची असून, थकीत कर्जाची वसुली व बॅँकांच्या स्थावर मालमत्तांची विक्री करून हे पैसे परत करावे लागणार आहेत. या अटीवरच विमा महामंडळाने ‘क्लेम’ मंजूर केला आहे.
एक लाखाच्या आतील एकूण ठेवी - ३२६ कोटी ६६ लाख ३० हजार
एक लाखाच्या आतील एकूण ठेवींचे वाटप - २१९ कोटी १५ लाख ७२ हजार
एक लाखांवरील एकूण ठेवी - १८१ कोटी ९० लाख ८३ हजार
एक लाखांवरील एकूण ठेवींचे वाटप - ८ कोटी ५५ लाख ४४ हजार