वाळवा तालुक्यातील २२८ बालकांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:26 AM2021-05-24T04:26:30+5:302021-05-24T04:26:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कोरोना संसर्गाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे निष्कर्ष वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून सांगितले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोना संसर्गाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे निष्कर्ष वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून सांगितले जात आहेत. मात्र, वाळवा तालुक्यात पहिल्या लाटेत ० ते ५ वर्षांच्या आतील ६५ आणि दुसऱ्या लाटेत १६३ मुलांनी कोरोनाचा यशस्वी मुकाबला करत त्याच्यावर मात केली आहे. त्यामुळे तज्ज्ञांचे निष्कर्ष काहीही असले तरी तालुक्यातील या लहान मुलांनी आपल्या जबर इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनाला हरवता येते हे दाखवून दिले आहे.
गेल्या मार्च महिन्यात इस्लामपूर शहरातून या कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली. माणसाला माणसापासून दूर ठेवणाऱ्या या विषाणूबाबत सर्वांच्याच मनात भीतीचे काहूर माजले होते. त्यानंतर हा संसर्ग तालुक्याच्या ग्रामीण भागात पसरत गेला. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर असलेली अनेक कुटुंबे, नागरिक गावी परतू लागले. या स्थलांतरामधूनही कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. त्यातून मग लॉकडाऊन, टाळेबंदी, बाहेर फिरण्यास आणि गर्दी करण्यास मज्जाव, मुखपट्टी, सॅनिटायझर, सामाजिक अंतर अशा नव्या पद्धती स्वच्छंदी जगण्यावर परिणाम करणाऱ्या ठरल्या.
पहिल्या लाटेचा जीवघेणा कहर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हाहाकार माजवून गेला. त्यानंतर थोडीशी उसंत घेतलेल्या या विषाणूने पुन्हा मार्च महिन्यापासून आपली दाहकता दाखवायला सुरुवात केली. सुरुवातीचा काही काळवगळता एप्रिल आणि मे महिन्यात पुन्हा या विषाणूने अनेक कुटुंबे उद-ध्वस्त करताना कित्येक घरातील कर्त्या माणसांचा बळी घेतला.
कोरोनाच्या या दोन्ही लाटांचा भयकंप डोके सुन्न करून टाकत असतानाच आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा मोठा धोका असल्याचे सांगितले जाऊ लागले. त्यामुळे या लाटेत मुलांना कसे जपायचे याची धास्ती अनेक कुटुंबांना लागून राहिली आहे. मात्र, वाळवा तालुक्यातील पाच वर्षांच्या आतील २२८ मुलांनी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत या कोरोना संसर्गावर मात केल्याचे आशादायी चित्र आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असते,असे वैद्यकीय शास्त्र सांगते आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना करताना आता पालकांनी आपली इच्छाशक्ती प्रबळ ठेवून राहणे गरजेचे आहे.
चौकट
सर्व बालके मृत्यूजंयी
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत वयाची चाळीशी ओलांडलेल्या आणि वृद्ध रुग्णांचा बळी गेला तर दुसऱ्या लाटेने २५ ते ३५ वयोगटांतील रुग्णांना आपल्या कराल दाढेत ओढले. या दोन्ही लाटेत मात्र ० ते ५ वयोगटांतील बालकांनी कोरोनावर मात केली. त्यातील एकाही बालकाने मृत्यूचे तांडव घालणाऱ्या कोरोनाला भीक घातली नाही. सर्व बालक मृत्युंजयी ठरले.