जिल्ह्यामध्ये २२,८४७ टीसीएम पाणीसाठा
By Admin | Published: August 24, 2016 10:51 PM2016-08-24T22:51:02+5:302016-08-24T23:44:30+5:30
दुष्काळातून जलसंवर्धनाकडे : शेतकऱ्यांना फायदा
अशोक डोंबाळे --सांगली --जिल्ह्यात या वर्षात जलयुक्त शिवार अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून १४१ गावांमध्ये पाझर तलाव, सिमेंट बंधारे, तलावातील गाळ काढणे, ओढे-नदीचे रूंदीकरण आदी ४०८१ कामे झाली आहेत. या कामांवर ६९ कोटी ९४ लाखांचा निधी खर्च झाला आहे. जून, जुलै, आॅगस्टमधील पावसामुळे तलाव, बंधाऱ्यांमध्ये २२ हजार ८४७.२२ टीसीएम पाणीसाठा झाला आहे. त्यातून २२ हजार ५४५.०७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे.
दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने पावसाचे पाणी गावामध्येच अडविण्यासाठी ‘जलयुक्त शिवार अभियान’ ही महत्त्वपूर्ण योजना आखली आहे. यासाठी जिल्ह्यातील १४१ गावांची निवड केली होती. या गावांमध्ये सिमेंट बंधारे, पाझर तलाव, जुन्या पाझर तलावांमधील गाळ काढणे अशी चार हजार ८१ कामे पूर्ण झाली. या कामांसाठी शासनाने १४३ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी जलसंधारणाच्या कामावर ६९ कोटी ९४ लाखांचा खर्च झाला आहे. याशिवाय, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही जलसंधारणाची कामे झाली. लोकसहभाग आणि शासनाच्या मदतीतून जत, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, कडेगाव या तालुक्यांमध्ये ७४९ विहिरीमधील गाळ काढण्यात यश आले आहे. चाळीस ते पन्नास वर्षांत अनेक विहिरींमधील गाळही काढला नव्हता. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या विहिरीतील गाळ काढण्यात प्रशासनास यश आल्यामुळे पाणीसाठा झाला आहे.
विहिरीतील गाळ काढण्यावर नऊ कोटी २१ लाखांचा निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात मोठ्याप्रमाणात जलसंधारणाची कामे झाल्यामुळे तेथे मोठ्याप्रमाणात पाणीसाठा झाल्याचे दिसून येत आहे. काही कामांचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे वळवाच्या पहिल्या पावसातच बंधाऱ्यांना गळती लागली आहे. मात्र काही निकृष्ट कामे सोडली तर, अग्रणी नदीवरील बेणापूर (ता. खानापूर) येथील सिमेंट बंधाऱ्यांची कामे पाहण्यासारखी आहेत. बहुतांशी सिमेंट बंधारे पाण्याने तुडूंब भरले आहेत. खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही बंधारे मान्सूनच्या पावसामुळे भरले आहेत. जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या बंधाऱ्यांसह तलावामध्ये २२ हजार ८४५ टीसीएम (हजार चौरस मीटर) पाणीसाठा झाला आहे.
लोकसहभागही वाढला : लाखो रूपयांची कामे
वाळवा व शिराळा तालुक्यातील तीस वर्षापूर्वीच्या तिळगंगा नदीचे सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार यांच्या प्रयत्नातून पुनरुज्जीवन झाले. नदी पात्रातील पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधले असून, त्यास ‘कर्मयोगी बाबासाहेब आमटे स्मृती बंधारा’ असे नावही देण्यात आले. यासह कुंडल येथेही अॅड्. दीपक लाड आणि त्यांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून ओढ्याचे पुनरुज्जीवन केले. हे उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत.
जलयुक्त शिवार योजनेतील
पूर्ण झालेली कामे
तालुकागावांची संख्यापूर्ण कामे
आटपाडी३०६०२
कडेगाव९४१२
क़ महांकाळ८१८१
खानापूर१५६२९
जत४२११९३
तासगाव२४४९७
मिरज१३७६२
एकूण१४१४२७६
जलयुक्त शिवार योजनेतून खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या अग्रणी नदीचे प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने पुनरुज्जीवन केले. अनेक सिमेंट बंधारे बांधले असून, तेथे मुबलक पाणीसाठा झाला आहे. जत, आटपाडीसह दुष्काळी तालुक्यातही जलसंधारणाची चांगली कामे झाली आहेत. पाणीसाठा झाल्यामुळे सिंचन क्षेत्रही वाढले आहे.
- सुचिता भिकाणे, उपजिल्हाधिकारी, सांगली.