Sangli: कृषी कंपनीची २३ लाखांची आर्थिक फसवणूक; लेखापाल दाम्पत्यासह बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 04:10 PM2024-09-05T16:10:09+5:302024-09-05T16:10:37+5:30
सांगली : कृषी क्षेत्रात कार्यरत ऑरबीट क्रॉप मायक्रोनुट्रीयंटस् या कंपनीची २३ लाख २५ हजार २८४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार ...
सांगली : कृषी क्षेत्रात कार्यरत ऑरबीट क्रॉप मायक्रोनुट्रीयंटस् या कंपनीची २३ लाख २५ हजार २८४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उत्तम महावीर अडसूळ (वय ३७), भाग्यश्री उत्तम अडसूळ (३३, दोघे, रा. झिल इंटरनॅशनलनजीक, कुपवाड) रविराज मुरग्याप्पा पळसे (४२, रा. दत्तनगर, कर्नाळ रस्ता) आणि विवेक रंजन (४९, रा. श्रीराम संकुल, एस.टी. कॉलनी रस्ता, विश्रामबाग) यांच्यावर विश्रामबाग पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दीपक प्रकाश राजमाने (रा. सिद्धिविनायकपूरम) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजयनगर परिसरात ऑरबीट क्रॉप मायक्रोन्युट्रीयंटस् ही कृषी क्षेत्रात कार्यरत कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीत मुख्य लेखापाल म्हणून उत्तम अडसूळ आणि सह लेखाकार भाग्यश्री अडसूळ हे पती-पत्नी कार्यरत होते. आर्थिक सर्व व्यवहार दोघेच सांभाळत होते. कंपनीच्या देखभालीसाठी आणि कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी फिर्यादी दीपक राजमाने यांनी कोरे धनादेश आडसूळ यांच्या ताब्यात दिले होते. दोघांची युनियन बॅँकेचे अधिकारी रविराज पळसे आणि मार्केट यार्ड येथील शाखाधिकारी विवेक रंजन यांच्याशी ओळख झाली होती. चौघांनी आर्थिक गैरव्यवहार करण्याचा प्लॅन आखला.
२०१८ पासून आडसूळ हे धनादेशावर परस्पर रक्कम टाकून ते पैसे काढत होते. दोघांना बँकेचे अधिकारी सामील होते. कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांनी वसूल केलेली रक्कम कंपनीच्या खात्यावर न टाकता अडसूळ हा स्वत:च्या खात्यावर वर्ग करीत होता. कंपनीचे आर्थिक व्यवहार पडताळणी केल्यानंतर फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला.
२०१८ ते दि. ५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत चौघांनी २३ लाख २५ हजार २८४ रुपयांची फसवणूक केली. राजमाने यांनी गेले अनेक दिवस आडसूळ यांच्याकडून रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु, फसवणूक केलेली रक्कम परत मिळाली नाही. त्यांनी राजमाने यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.