ग्रामसेवकांचा २३ लाखांचा अपहार
By admin | Published: July 19, 2014 11:18 PM2014-07-19T23:18:38+5:302014-07-19T23:23:10+5:30
तिघांचा समावेश : जत पंचायत समितीचा अहवाल
जत : तालुक्यातील बोर्गी खुर्द व बोर्गी बुद्रुक या दोन ग्रामपंचायतींमधील तीन ग्रामसेवकांनी २०११ ते ३१ मार्च २०१४ अखेरच्या कालावधित २३ लाख ३० हजार रुपयांचा अपहार केला आहे. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, असा अहवाल जत पंचायत समितीने जिल्हा परिषदेला पाठविला आहे. त्यामुळे तालुक्यातील महसूल विभागात खळबळ माजली आहे.
२०११-२०१४ या कार्यकाळात आर. के. धाबेकर ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी पर्यावरण संतुलित गाव, तेरावा वित्त आयोग व पाणीपुरवठा योजना आदी कामात गैरव्यवहार करून २२ लाख रुपयांचा अपहार केला आहे. २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात अशोक बिरादार यांनी ७० हजार रुपये व ए. टी. खोत यांनी ६० हजार रुपयांचा अपहार केला आहे. वरील एकत्रित २३ लाख ३० हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली होती. त्यानुसार प्रशासनाने जत पंचायत समितीला चौकशीचे आदेश दिले होते. जत पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाने वरील तीन ग्रामसेवकांनी केलेल्या विविध विकासकामांची चौकशी करून २३ लाख ३० हजार रुपये अपहाराची रक्कम निश्चित केली आहे.
जिल्हा परिषद व जत पंचायत समितीने वरील तीन ग्रामसेवकांवर अपहाराचा ठपका ठेवून कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा परिषदेतील एक पदाधिकाऱ्याने ग्रामसेवकांची बाजू घेतली आहे. तिघे ग्रामसेवक निरपराध आहेत, असे वरिष्ठांना सांगून त्यांना ग्रामसेवकांचा २३ लाखांचा अपहारपाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे. चौकशी समितीमधील अधिकाऱ्यांची येथून बदली करून या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी या ग्रामसेवकांनी प्रयत्न सुरू केले आहेत, असेही समजते. (वार्ताहर)
कारवाईचा निर्णय
जिल्हा परिषद व जत पंचायत समितीने वरील तीन ग्रामसेवकांवर अपहाराचा ठपका ठेवून कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.