बनावट दाखले दिलेल्या २३ जणांचे लायसन्स रद्द : ‘आरटीओं’चा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 01:27 AM2019-01-05T01:27:30+5:302019-01-05T01:29:30+5:30
बनावट शाळा सोडल्याचे दाखले, आठवी पास उत्तीर्णची गुणपत्रिका सादर करुन वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) मिळविलेल्या जिल्ह्यातील २३ जणांचे लायसन्स कायमस्वरुपी रद्द करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी शुक्रवारी केली.
सांगली : बनावट शाळा सोडल्याचे दाखले, आठवी पास उत्तीर्णची गुणपत्रिका सादर करुन वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) मिळविलेल्या जिल्ह्यातील २३ जणांचे लायसन्स कायमस्वरुपी रद्द करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी शुक्रवारी केली. या सर्वांना कारवाईची नोटीसही बजावण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात सुमारे ९२ हजार कागदपत्रांची, फायलींची तपासणी करुन या २३ जणांना शोधून काढण्यात आले आहे. अजूनही फायलींची तपासणी सुरु असून, हा आकडा वाढू शकतो, असेही कांबळे यांनी सांगितले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गेल्या आठवड्यात शाळा सोडल्याचे बोगस दाखले व गुणपत्रिका देणाऱ्या तासगाव येथील शिक्षक किरण होवाळे यास अटक केली होती. त्याच्याकडून दाखला नेण्यास आलेल्या सहा जणांनाही अटक केली होती. सध्या सर्वजण पोलीस कोठडीत आहेत. होवाळे याने चिंचणी (ता. तासगाव) येथील डी. के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व तासगावमधील यशवंत हायस्कूलच्यानावाने दाखले दिल्याचे स्पष्ट झाले होते. या दोन हायस्कूलच्या नावाने आतापर्यंत किती दाखले लायसन्स काढण्यास आले आहेत, याची माहिती देण्याची मागणी पोलिसांनी आरटीओ कार्यालयात केली होती. २०१६-१८ ते या तीन वर्षातील रेकॉर्ड काढण्यात आले होते.
कांबळे म्हणाले, शुक्रवारपर्यंत २०१७-१८ या वर्षात रिक्षा व मालवाहतूक वाहन चालविण्यास लायसन्स काढण्यास आलेल्या सुमारे ९२ हजार फायली तपासून झाल्या. यामध्ये यशवंत हायस्कूल २१, डी. के. पाटील हायस्कूलचा १ व सांगली हायस्कूलमधील १ असे २३ बनावट दाखले आढळून आले आहेत. सांगली, मिरज कवठेमहांकाळ, जत, तासगाव व कडेगाव तालुक्यातील हे २३ जण आहेत. या सर्वांनी शाळा सोडल्याचे बोगस दाखले व आठवी पास झाल्याची गुणपत्रिका जोडून लायसन्स मिळविले आहे. या सर्वांचे लायसन्स कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहे. यापुढे त्यांना लायसन्स व वाहन चालविण्याचा परवानाही दिला जाणार नाही.
या कारवाईची त्यांना नोटीसह बजावण्यात आली आहे. या २३ जणांची यादी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. २०१६ या वर्षात रिक्षा व मालवाहतूक वाहनाचे लायसन्स काढण्यास किती उमेदवारांनी फाईल सादर केली होती, याची तपासणी सुरु करण्यात आली आहे. ती शनिवारपर्यंत पूर्ण होणार आहे.
एकच जावक क्रमांक
होवाळे याने शाळा सोडल्याच्या दिलेल्या दाखल्यावर एकच जावक क्रमांक आढळून आला आहे. प्रत्येक दाखल्यावर ५५१ हा जावक क्रमांक आहे. आठवी पासच्या गुणपत्रिकेतही सर्वांना प्रत्येक विषयावर एकसारखेच गुण दिले आहेत. इंग्रजी विषयाला प्रत्येकास त्याने ३५ गुण दिले आहेत. तसेच अन्य विषयात ४५ च्या आतच गुण दिले आहेत.
२३ जण पिंजºयात
बोगस दाखले दिलेले २३ जण संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. त्यांना आरोपीच्या पिंजºयात उभे केले जाऊ शकते. यासंदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे म्हणाले, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनानुसार यामध्ये पुढील कारवाई केली जाईल. तसेच जिल्हा सरकारी वकिलांचा अभिप्रायही घेतला जाईल.