‘सामोपचार’साठी २३ संस्था पात्र
By admin | Published: February 9, 2016 12:08 AM2016-02-09T00:08:59+5:302016-02-09T00:16:40+5:30
जिल्हा बॅँक : ५० कोटींची थकबाकी वसूल होणार; मार्चअखेर वीस कोटी वसुली
सांगली : सामोपचार परतफेड योजनेअंतर्गत सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने २३ पात्र संस्थांची यादी तयार केली आहे. संबंधितांकडे जवळपास ५0 कोटी ८ लाख रुपये थकित असून, योजनेअंतर्गत किमान ३० कोटी रुपये वसूल होण्याची चिन्हे आहेत. येत्या मार्चअखेर यातील २० कोटी रुपये वसूल होण्याची अपेक्षा बॅँकेला आहे.
बॅँकेच्या जानेवारीतील विशेष सभेत या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. ३१ मार्च २०१५ अखेर बॅँकेकडे शेती संस्थांसह एकूण ६४६ संस्था व व्यक्ती या एनपीएमध्ये आहेत. त्यांच्या थकित कर्जासाठी बॅँकेने १४३ कोटी ६३ लाख २५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एन.पी.ए. चे प्रमाण सध्या ७.६२ टक्के असून, नेट एन. पी. ए. ३.४४ इतका आहे. जास्तीत-जास्त कर्जवसुलीतून हे प्रमाण कमी करायचे आहे. त्या उद्देशातूनच सामोपचार कर्ज परतफेड योजना राबविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. बॅँकेमार्फत २००४ पासून एकरकमी कर्ज परतफेड योजना सुरू आहे. आजअखेर ५६ संस्थांनी याचा लाभ घेतला आहे. बॅँकेकडील जुनी थकित कर्जबाकी १९९२-९३ पासून आहे. अशा संस्थांविरोधात बॅँकेने सहकार न्यायालयात दावेसुद्धा दाखल केलेले आहेत. त्यामुळे थकबाकीदार संस्थांकडून वसुलीसाठी ही योजना तयार केली आहे. योजनेच्या लाभासाठीची ३१ मार्च २०११ पर्यंतच्याच एनपीएमधील संस्था पात्र ठरू शकतात. अशा एकूण ८५ संस्थांची यादी सुरुवातीच्या टप्प्यात तयार करण्यात आली होती. निकषांमध्ये यातील केवळ २३ संस्था पात्र ठरल्या आहेत. त्यांच्याकडील वसुली झाली तर एनपीएचे प्रमाण कमी होऊ शकते. न्यायालयीन लढाईत जाणारा वेळ व पैसा वाचू शकतो. (प्रतिनिधी)
टँकरसाठी कर्जपुरवठा
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कर्जदारांच्या बागा जगविण्याच्या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने पाण्याच्या टँकरसाठीही कर्जपुरवठा सुरू केला आहे. एकरी चाळीस हजार रुपये पाण्याच्या टँकरसाठी कर्ज देण्यात येत आहे. योजनेची अंमलबजावणीही सुरू असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी दिली.