खानापूर, आटपाडीचे २३ सराफ ‘एनआयए’च्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:24 AM2020-12-24T04:24:31+5:302020-12-24T04:24:31+5:30
विटा : चार महिन्यांपूर्वी उघडकीस आलेले ४२ कोटी रुपये बाजारमूल्य असलेले ८३ किलो ६२१ ग्रॅमचे आंतरराष्ट्रीय सोने तस्करीचे कनेक्शन ...
विटा : चार महिन्यांपूर्वी उघडकीस आलेले ४२ कोटी रुपये बाजारमूल्य असलेले ८३ किलो ६२१ ग्रॅमचे आंतरराष्ट्रीय सोने तस्करीचे कनेक्शन आता खानापूर व आटपाडी तालुक्यांत पोहोचले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास प्राधिकरणाचे (एनआयए) पथक बुधवारी विटा पोलीस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणाशी येथील काही सराफ व्यावसायिकांचे लागेबांधे असल्याचे समजते. सध्या २३ व्यावसायिक एनआयएच्या रडारवर आले आहेत.
दि. २८ ऑगस्टला दिल्ली रेल्वे स्थानकात महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) आठजणांकडे असलेले सुमारे ४२ कोटी रुपये बाजारमूल्याचे ८३ किलो ६२१ ग्रॅम सोने जप्त केले होते. याप्रकरणी आठ संशयितांना ताब्यात घेतले होते. हे आठजण स्वत:ची ओळख लपविण्यासाठी बनावट आधारकार्ड तयार करून गुवाहाटीवरून सोने तस्करी करीत असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.
ताब्यात घेतलेल्या आठ संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर खानापूर व आटपाडी तालुक्यांतील काही सराफांचे या प्रकरणाशी लागेबांधे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या पार्श्वभूमीवर एनआयएचे पथक बुधवारी विटा पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी खानापूर तालुक्यातील २३ सराफ व्यावसायिकांची चौकशी करून त्यांना दि. २६ डिसेंबर रोजी विटा पोलिसांत हजर राहून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हे सर्व सराफ व्यावसायिक आता एनआयएच्या रडारवर आले असल्याने खळबळ उडाली आहे.