सांगली जिल्ह्यातील २३३ सहकारी संस्था निघणार अवसायनात, कार्यवाहीस सुरुवात
By अविनाश कोळी | Published: April 1, 2023 12:12 PM2023-04-01T12:12:11+5:302023-04-01T12:12:35+5:30
जिल्ह्यातील ७३ संस्था गायब
अविनाश कोळी
सांगली : राज्य शासनाच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. आजवर झालेल्या सर्वेक्षणानुसार २३३ सहकारी संस्था अवसायनात काढण्याची तयारी सुरु असून एका संस्थेची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
सर्वेक्षणामध्ये बंद असलेल्या, कार्यस्थगित, कागदोपत्रीच अस्तित्वात असलेल्या संस्थांचा शोध घेऊन त्यांच्यावर सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार अवसायन व प्रसंगी नोंदणी रद्दची कारवाई केली जात आहे. बँक, पतसंस्था, विकास सोसायट्या, औद्योगिक संस्था आदी संस्थांची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात ही मोहीम गतीने सुरु असून येत्या काही दिवसांत ती पूर्ण होणार आहे. आजवर ७१७ सहकारी संस्थांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित संस्थांची तपासणी लवकरच पूर्ण होईल, असे सहकार विभागाने सांगितले.
२२५ संस्थांच्या अवसायनाचे अंतरिम आदेश
आजपर्यंत झालेल्या सर्वेक्षण अंतर्गत २३३ सहकारी संस्था अवसायनात काढण्यात येणार असून २२५ संस्थांच्या अवसायनाचे अंतरिम तर त्यातील १४७ संस्थांच्या अवसायनाचे अंतिम आदेश काढण्यात आले आहेत.
तालुकानिहाय अवसायनात काढण्यात येणाऱ्या संस्था
आटपाडी ३०
जत १८
क. महांकाळ ६
विटा १०
मिरज ७९
शिराळा ८
तासगाव ९
वाळवा ५५
पलूस ८
कडेगाव १०
जिल्ह्यातील ७३ संस्था गायब
नोंदणीकृत पत्त्यावर एकूण ७३ सहकारी संस्था आढळून आलेल्या नाहीत. यामध्ये सर्वाधिक पलूस तालुक्यातील ३७, मिरज तालुक्यातील १२ सहकारी संस्थांचा समावेश आहे.
१३१ सहकारी संस्थांचे सर्वेक्षण बाकी
जिल्ह्यातील एकूण ८५१ सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यातील ७१७ संस्थांचे सर्वेक्षण पूर्ण असून अद्याप १३१ संस्थांचे सर्वेक्षण व्हायचे आहे. यात मिरज तालुक्यातीलच १२५ संस्था आहेत.
४४ संस्था कार्यरत होऊ शकतात
सर्वेक्षणातील अभ्यासाअंती जिल्ह्यातील ४४ सहकारी संस्था पुन्हा कार्यरत होऊ शकतात, असे सहकार विभागाने म्हटले आहे. यात पलूस तालुक्यातील सर्वाधिक २९ संस्थांचा समावेश आहे.
सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सर्वेक्षण होईल त्याप्रमाणे अवसायन व अन्य कारवाई केली जात आहे. - मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक, सांगली