२४ तास पाणी अन् स्वच्छ रत्नागिरीचं स्वप्न

By admin | Published: January 20, 2016 11:45 PM2016-01-20T23:45:57+5:302016-01-21T00:23:31+5:30

महेंद्र मयेकर : ‘लोकमत’च्या थेट संवाद कार्यक्रमात नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांशी मोकळी बातचित - लोकमत थेट मुलाखत

24-hour water and clean Ratnagiri's dream | २४ तास पाणी अन् स्वच्छ रत्नागिरीचं स्वप्न

२४ तास पाणी अन् स्वच्छ रत्नागिरीचं स्वप्न

Next

रत्नागिरी : शहरातील पाण्याच्या पाईप्स बदलून आणि पाण्याचे काटेकोर आॅडिट करून रत्नागिरीकरांना चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्याचे आपले स्वप्न आहे. त्याचप्रमाणे भुयारी गटाराच्या माध्यमातून सांडपाण्याचा निचरा करून रत्नागिरी शहर स्वच्छ - सुंदर बनवण्याचाही आपला मानस आहे. या दोन्ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारल्या असल्यामुळे रत्नागिरीकरांना लवकरच अपेक्षित बदल दिसतील, असा ठाम विश्वास नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी व्यक्त केला.
‘लोकमत’ कार्यालयात ‘थेट संवाद’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी जवळजवळ दीड तास मनमोकळी बातचित केली. त्यांच्यासमवेत मुख्याधिकारी मिलिंद खोडके हेही उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या रत्नागिरी शहराला ‘अच्छे दिन’ येणार असल्याची प्रचिती दिली. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी दिलेले १00 कोटी रूपये खर्चाचे दोन प्रस्ताव आपण स्वीकारत असल्याचे व्यासपीठावरूनच जाहीर केले. हे प्रस्ताव नेमके काय आहेत, याची पूर्ण माहिती मयेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. पाणी योजनेसाठी ५२ कोटी रुपयांची योजना आहे. शीळ धरणाकडून रत्नागिरीकडे येणारी पाईपलाईन खूप जुनी आहे. अनेक ठिकाणी ती फुटली आहे. त्यामुळे रोज जवळपास पाच दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) पाणी वाया जाते. त्यावर अनेकदा दुरूस्ती करून झाली असली तरी आता जीर्णच झाली आहे. ती पाईपलाईन पूर्णपणे बदलली जाणार आहे. या पाईपलाईनप्रमाणेच रत्नागिरी शहरातील सर्वच्या सर्व पाईपलाईन बदलल्या जाणार आहेत.
पाईपलाईन बदलल्यास अनेक प्रकारचे फायदे होणार आहेत. मुख्य वाहिनी बदलली गेल्यामुळे वाया जाणारे पाणी वाचेल. शहराला रोज ११ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. पण पाणी वाया जात असल्यामुळे १६ दशलक्ष घनमीटर पाणी खेचावे लागते. उर्वरित पाच दशलक्ष घनमीटर पाणी खेचण्याचा वीज खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल. सध्याच्या पाणी योजनेपोटी नगर परिषदेला ३ कोटींचा तोटा दरवर्षी सहन करावा लागतो. दर महिन्याला पाणी खेचण्यासाठी विजेचे बिलच १५ लाख रुपये येते, जर गळती थांबली तर गरजेइतकेच पाणी खेचले जाईल, त्यामुळे वीज खर्च वाचेल.
शहरातील एकूणच पाईपलाईन जीर्ण झाल्या आहेत. त्या बदलल्या गेल्या तर त्यातूनही खूप पाणी वाचेल. त्यामुळेच रत्नागिरी शहराला २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे मयेकर यांनी सांगितले.
आजवर मुख्य वाहिनी बदलण्याचा विचार अनेकदा झाला. पण, प्रत्यक्ष कृती झाली नव्हती. सरकारकडून निधी मिळण्याची आशा नव्हती. आता मात्र मुख्यमंत्र्यांनी या योजनेला हिरवा कंदील दाखवल्यामुळे पुढील २५ वर्षांसाठी रत्नागिरीची पाणी समस्या सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
५२ कोटी रुपयांच्या या योजनेतील ८ कोटी रुपये पानवल धरणाच्या पाईपलाईनसाठी वापरले जाणार आहेत. एकही रुपया वीजबिल न भरता पानवल धरणाचे पाणी शहरासाठी वापरता येते. भौगोलिक उतारावर हे पाणी रत्नागिरीपर्यंत येते. पण, त्यासाठीचे पाईप खूप जुने झाले आहेत. त्यामुळे बरेच पाणी वाया जाते. पाईपलाईन बदलली तर पाण्याची उपलब्धता वाढेल आणि त्यामुळे शीळ धरणावरील भार कमी होईल. त्यामुळे पानवल धरणाची दुरूस्ती आणि त्याची पाईपलाईन याचा समावेशही याच योजनेत करण्यात आल्याचे मुख्याधिकारी खोडके यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेली आणखी एक योजना म्हणजे भुयारी गटार. रत्नागिरी शहराला मुळातच भौगोलिक उतार आहे. त्यामुळे सांडपाणी समुद्राकडे घेऊन जाण्यासाठी कोणताही खर्च येत नाही. पण आहे ती गटार व्यवस्था जुनी झाली आहे. त्यातच अनेक ठिकाणी योग्य बांधकाम नसल्यामुळे त्यातून उद्भवणाऱ्या समस्या अधिक आहेत. भुयारी गटारे बांधल्यास मुळात शहरातील अस्वच्छता, दुर्गंधी कमी होईल. भुयारी गटारांमधून जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध केले जाईल. हे शुद्ध पाणी समुद्रात सोडण्याऐवजी शेती, बागायतींसाठी त्याची विक्री करण्याचा प्रस्ताव आहे. शुद्धीकरण यंत्रणेसह या योजनेसाठी ४८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शहरातील काही भाग उंच सखल आहेत. या साऱ्याचा विचार करून येत्या महिनाभरात आराखडा तयार होईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)


पाण्याचे होणार काटेकोर आॅडिट
सद्यस्थितीत जोडणीनिहाय मीटर बसवण्यात आले आहेत. मात्र, आता ते सर्व काढून आधुनिक मीटर बसवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मुख्य वाहिनी तसेच जोडवाहिनी अशा ठिकाणीही मीटर बसवले जाणार आहेत. त्यामुळे पाणी उपसा किती झाला आणि प्रत्यक्षात प्रत्येक घरापर्यंत किती पाणी पोहोचले, याचे काटेकोर आॅडिट होईल. घरोघरी आधुनिक पाणीमीटर असल्याने एकाच जागेवरून २00 मीटर परिसरातील पाणीमीटर्सचे रिडिंग संगणकावर अत्यंत थोडक्या वेळेत घेतले जाईल, असेही मयेकर यांनी सांगितले.


नगर परिषदेतच खत प्रकल्प
कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाला जागा मिळत नाही. दुर्गंधी येते, अशी तक्रार लोक करतात. त्यामुळे आता नगर परिषदेच्या आवारातच एक खड्डा खणून त्यात भाजीपाला तसेच ओला कचरा साठवला जात आहे. त्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे. त्याहीपुढे जाऊन मोठी जागा मिळाल्यानंतर बायोगॅसनिर्मिती आणि त्यावर वीजनिर्मिती करून ती पथदिव्यांसाठी वापरण्यात येणार आहे.


प्रत्येक कुटुंबाला दोन डस्टबीन
शहरात २५ हजार कुटुंब आहेत. त्यांना प्रत्येकी दोन डस्टबीन दिल्या जातील. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीवाल्याकडे दिला तर पुढील प्रक्रिया सोप्या होतील. या उपक्रमात लोकसहभाग मिळण्यासाठी नगर परिषद सर्वांना डस्टबीन पुरवणार आहे आणि त्यासाठी फिनोलेक्स, जिंदल, गद्रे मरिन यांसारख्या कंपन्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे, असेही ते म्हणाले.


फुलपाखरू उद्यान, तारांगण आणि सर्पोद्यान
रत्नागिरीत आलेले पर्यटक गणपतीपुळे पाहून येतात आणि पावसला निघून जातात. त्यांनी रत्नागिरीत मुक्काम करावा, यासाठी रत्नागिरीत फुलपाखरू उद्यान, सर्पोद्यान तसेच तारांगण करण्याचा प्रयत्न आहे. अशा उपक्रमांसाठी पर्यटक रत्नागिरीत मुक्काम करतील आणि त्यातून इथल्या अर्थव्यवस्थेला थोडी चालना मिळेल, असा विश्वास मयेकर आणि खोडके यांनी व्यक्त केला.


हागणदारीमुक्ततेसाठी गुडमॉर्निंग पथक
रत्नागिरी शहर स्वच्छ व सुंदर व्हावे, यासाठी हागणदारीमुक्ततेची गरज आहे. समुद्रकिनारी उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. ते रोखण्यासाठी नगर परिषदेची दोन ‘गुडमॉर्निंग पथके’ तयार करण्यात आली आहेत. एका पथकात सहा असे बारा कर्मचारी पहाटे पाच-साडेपाच वाजताच बॅटरी घेऊन समुद्रकिनारी जातात आणि तेथे उघड्यावर शौचाला बसलेल्यांमध्ये असे न करण्याबाबत जागृती करतात. आतापर्यंत अनेकांना याबाबतची समज देण्यात आली आहे आणि न ऐकल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यातील बहुतांश लोक परजिल्ह्यातून आलेले असल्याचेही लक्षात आले आहे, असे मयेकर यांनी सांगितले.


आता इथे मीच
राजकारणात कोणाला कुठे ठेवायचे, हे चांगलेच माहिती आहे. त्यामुळे टर्म पूर्ण होईपर्यंत नगराध्यक्षपदी मीच राहणार असल्याचे ते मिश्किलपणे म्हणाले.

Web Title: 24-hour water and clean Ratnagiri's dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.