मिरज तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रांसाठी २.४३ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:27 AM2021-03-10T04:27:42+5:302021-03-10T04:27:42+5:30
मिरज : मिरज तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३६ उपकेंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नातून ...
मिरज : मिरज तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३६ उपकेंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत २ कोटी ६८ लाख २५ हजारांचा निधी मजूर झाला आहे, अशी माहिती मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रम पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, मिरज तालुक्यातील आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न निधीअभावी निर्माण झाला होता. संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न निकालात निघाला आहे. तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३६ उपकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी २ कोटी ६८ लाख २५ हजारांचा निधी मजूर आहे. आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे २५ लाख व ३६ उपकेंद्रांसाठी दोन कोटी ४३ लाखांचा निधी मिळणार आहे. या निधीतून इमारत दुरूस्ती, फर्निचर नूतनीकरणाची कामे करण्यात येणार आहे, असेही पाटील म्हणाले. पंचायत समिती सदस्य राहुल सकळे, काकासाहेब धामणे, किरण बंडगर यावेळी उपस्थित होते.
चौकट
आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणास मदत
संजयकाका पाटील यांनी निधीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी १८ कोटींचा निधी मजूर झाला आहे. पैकी २ कोटी ६८ लाख २५ हजारांच्या मंजूर निधीतून मिरज तालुक्यातील आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणास मदत होणार आहे, असे विक्रम पाटील यांनी सांगितले.