ढवळेश्वरात जंतनाशक गोळ्या खाल्ल्याने २५ बालकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:02 AM2017-08-19T00:02:34+5:302017-08-19T00:02:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित मोफत जंतनाशक औषध वाटप मोहिमेचा भाळवणी (ता. खानापूर) गावात प्रारंभ होत असतानाच, तेथून पाच किलोमीटरवरील ढवळेश्वर येथे अंगणवाडीतील बालकांनी वाटप केलेल्या जंतनाशक गोळ्या खाल्ल्यानंतर, चक्कर, उलट्या, पोट दुखणे, असे त्रास सुरू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली.
ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. त्यामुळे २५ बालकांना विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यातील आठ बालकांना पुढील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा प्रचंड हादरली असून, जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम तातडीने थांबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.
जिल्हा परिषदेने राष्टÑीय जंतनाशक दिनानिमित्त दि. १८ व २३ आॅगस्ट या दोन दिवशी १ ते १९ वयोगटातील मुलांना शाळेत जाऊन मोफत जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवार, दि. १८ रोजी सकाळी भाळवणी येथील उर्दू शाळेत या मोहिमेचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. भाळवणी येथे हा कार्यक्रम सुरू असतानाच ढवळेश्वर येथील तीन अंगणवाड्यांतील मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मुलांना पाच ते दहा मिनिटातच चक्कर येणे, उलट्या होणे, डोळ्यावर झापड येणे, अंग थरथरणे असे प्रकार सुरू झाले. काही लहान मुले जमिनीवर कोसळली. त्यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविकांची तारांबळ उडाली. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ पालकांना दिल्यानंतर पालकांनी मिळेल त्या वाहनाने मुलांना विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश लोखंडे यांच्यासह शहरातील खासगी डॉक्टरांचे पथक तातडीने रुग्णालयात दाखल झाले. मुलांवर उपचार सुरू झाल्यानंतर नातेवाईकांची मोठी गर्दी झाली. आ. अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित राऊत, गोपीचंद पडळकर, संग्रामसिंह देशमुख, सुहास बाबर, तम्मणगौडा रवी-पाटील, ब्रह्मानंद पडळकर, नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, अमोल बाबर, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार सौ. रंजना उबरहंडे, सुहास पाटील, सौ. कविता घाडगे यांनी रुग्णालयात येऊन बालकांची विचारपूस केली.
या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम थांबविण्यात आली आहे.
आठ जणांना सांगलीला हलविले
संग्राम सुभाष किर्दत, विश्वजित सुभाष पवार, विराज धनाजी किर्दत, गायत्री रमेश किर्दत, ऋतुराज भरत गुजले, अथर्व सुभाष थोरात, स्वरा किरण मंडले, नेहा रूपेश किर्दत या आठ बालकांना सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे.