Maharashtra Budget 2023: सांगलीत होणार नवे नाट्यगृह; २५ कोटींचा निधी मंजूर
By शीतल पाटील | Published: March 9, 2023 08:00 PM2023-03-09T20:00:49+5:302023-03-09T20:01:57+5:30
महापालिकेचे दीनानाथ नाट्यगृह चार ते पाच वर्षांपासून बंद आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून नाट्यगृहाची साडेसाती संपली नव्हती
सांगली : महापालिकेचे दीनानाथ नाट्यगृह चार ते पाच वर्षांपासून बंद आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून नाट्यगृहाची साडेसाती संपली नव्हती. अखेर श्यामरावनगर येथील महापालिकेच्या खुल्या भूखंडावर नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ३७.५० कोटींचा आराखडाही तयार केला. अखेर राज्याच्या अर्थसंकल्पात सांगलीतील नाट्यगृहासाठी २५ कोटींच्या निधीची घोषणा झाली आणि नाट्यगृहाला लागलेली साडेसाती संपुष्टात आले.
नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीत नाट्यगृहाची अवस्था बिकट आहे. विष्णुदास भावे नाट्यगृह वगळता एकही चांगले नाट्यगृह नाही. महापालिकेच्या दीनानाथ नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. शहरात आलेल्या महापुरानंतर नाट्यगृह बंदच पडले आहे. त्यात रंगमंच, वातानुकूलित यंत्रणा, ध्वनी यंत्रणा चांगली नसल्याने महापालिकेच्या नाट्यगृहात नाटकांचे प्रयोगच झाले नाही. लावणी व इतर कार्यक्रमापुरतेच हे नाट्यगृह उरले होते. त्यामुळे नाट्यप्रेमींतून नव्या नाट्यगृहाची मागणी जोर धरू लागली होती.
भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, नगरसेवक शेखर इनामदार, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम यांनी नव्या नाट्यगृहासाठी पाठपुरावा केला. महापालिकेने ३७.५० कोटींचा आराखडा तयार करून शासनाला सादर केला. भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने निधीची मागणी केली. अखेर अर्थसंकल्पात नाट्यगृहासाठी २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.
श्यामरावनगरमधील आठ एकर जागेत नाट्यगृह, ओपन लाॅन, बहुद्देशीय सभागृह, अम्पीथिएटर उभारले जाणार आहे. नाट्यगृहाची क्षमता ७५० इतकी आहे. ३७० दुचाकी व ११२ चारचाकी वाहनासाठी पार्किग, गुलमोहर, बहावा, सप्तपर्णी, रक्तचंदन आदी विविध प्रकारांची ५००हून अधिक झाडे लावण्यात येणार आहेत.
नाट्यगृहाची वैशिष्ट्ये
- श्यामरावनगरमधील आठ एकर जागेत वातानुकूलित नाट्यगृहाची उभारणी.
- तळमजल्यासह दुमजली इमारत.
- नाट्यगृहाच्या दोन्ही मजल्यावर प्रत्येकी ३७५ आसनक्षमता.
- तळमजल्यावर एक हजार क्षमतेचे सभागृह व उपहारगृह.
- पहिल्या मजल्यावर नाट्यगृह, कलाकरांसाठी रुम.
- दुसऱ्या मजल्यावर चार व्हीआयपी सुट व विश्रांतीगृह.
ओपन लॉन व अम्पीथिएटर
नाट्यगृहाच्या आवारात खुले लाॅनची निर्मिती केली जाणार आहे. त्याची क्षमता २००० लोकांची आहे, तर ४०० आसनक्षमता असलेले अम्पीथिएटरही उभारले जाणार आहे. त्यावर ३६.३५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.