हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी सांगली महापालिकेकडून २५ कोटीचा आराखडा, सुनील पवार यांची माहिती
By शीतल पाटील | Published: March 3, 2023 09:26 PM2023-03-03T21:26:03+5:302023-03-03T21:26:43+5:30
Sangli Municipal Corporation : केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी देशातील प्रदूषित शहरांची यादी लोकसभेत जाहीर केली. त्यामध्ये राज्यातील १९ शहरात सांगलीचा समावेश आहे.
सांगली : सर्वाधिक प्रदूषित हवेच्या शहरांमध्ये सांगलीचा समावेश आहे. शहरातील धूळ प्रदूषण रोखण्यासाठी ८ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. पुढील पाच वर्षात प्रदूषण रोखण्यासाठी खासगी एजन्सीमार्फत २५ कोटींचा आराखडा तयार केला जाणार असल्याची माहिती आयुक्त सुनील पवार यांनी पत्रकार बैठकीत दिली.
केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी देशातील प्रदूषित शहरांची यादी लोकसभेत जाहीर केली. त्यामध्ये राज्यातील १९ शहरात सांगलीचा समावेश आहे. सांगलीत धुळीमुळे हवा प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. हवा प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र शासनाचे निर्देश आहेत. उपाययोजनांसाठी केंद्राने निधीही दिलेला आहे. केंद्र शासनाने नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम या योजनेंर्गत महापालिकेला ८ कोटींचा निधी दिला आहे. माझी वसुंधराअंतर्गत पर्यावरण संवर्धनाचा ७ कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्र हवा प्रदूषणमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
धुळीमुळे हवेचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मिरज मुख्य कार्यालयाचे प्रवेशद्वार, सांगली कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल, सांगली सिव्हिल ते त्रिकोणी बाग आणि कुपवाड मुख्य कार्यालय मार्गावर पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सांगली एसटी स्टँड, लक्ष्मी मार्केट चौक मिरज, शिंदेमळा रोड, रेल्वे पूल याठिकाणी कारंजे, कुपवाड रोड लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्कपर्यंत ग्रीन कॉरिडॉर, महापालिकेच्या सांगली व मिरज मुख्यालय व स्फुर्ती चौकात व्हर्टिकल गार्डन, विश्रामबाग चौक, राजवाडा चौक, मिरजेत महाराणा प्रताप चौक, कुपवाडमध्ये आर. पी. पाटील चौक येथे हवा शुद्धीकरण मशिन बसवले जाणार आहे.
चार ठिकाणी पाणी स्प्रिंकलरद्वारे धुळीकणांचे प्रदूषण कमी केले जाणार आहे. रस्त्यांच्याकडेला साचणारी धुळ शोधण करण्यासाठी मशिन खरेदी केले जाणार आहेत. मिरज येथील फायर स्टेशन कार्यालयात इलेक्ट्रीक वाहने चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. डॉग व्हॅनच्या ई-रिक्षा घेतल्या जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.